श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील अशोकनगर आणि दत्तनगर येथे शिवजयंती साजरी !
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आज प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात, चौकाचौकात आहेत; परंतु महाराजांचे विचार आपल्या हृदयात आणि रक्तात उतरले आहेत का, याचा विचार व्हायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्ये आचरणात आणायला हवीत. ती आचरणात आणण्यासाठी शिवचरित्र घराघरात पोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ते अशोकनगर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
अलीकडे काही संघटना छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष असल्याची छबी रंगवत आहेत. या त्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता खरा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. महाराजांनी ज्याप्रमाणे त्यांच्या कुलस्वामिनीची उपासना करून आध्यात्मिक बळ प्राप्त केले, तशीच उपासना आपणही करणे आवश्यक आहे. महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करून व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने बलाढ्य अमेरिकेला जेरीस आणले. अशा पद्धतीने साता समुद्रापलीकडे कीर्ती पोचलेल्या महाराजांना आपण विसरून चालणार नाही. महाराजांचे जीवनचरित्र अभ्यासून त्याप्रमाणे आचरण केल्यास राष्ट्र आणि धर्म यांसमोरील बर्याच समस्या सुटू शकतात, असे श्री. प्रशांत जुवेकर यांनी या वेळी सांगितले.
श्री दत्त मंदिर, अशोकनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या आरंभी श्री. प्रशांत जुवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यांचा सत्कार श्री. नाना काळे यांनी केला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. शिवजयंतीनिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या नियोजनात सर्वश्री तात्या तावडे, नाना काळे, अर्जुन मापारी, विष्णुपंत पारखे, राहुल मापारी यांनी प्रमुख सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा लाभ स्थानिक ग्रामस्थांनी घेतला. कार्यक्रमापूर्वी वाहनफेरी काढण्यात आली होती. त्यापूर्वी अशोकनगर येथील साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्री. प्रशांत जुवेकर यांनी पुष्पहार घातला. या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जगणे आवश्यक ! – रामेश्वर भुकन, हिंदु जनजागृती समिती
दिशाहीन झालेल्या आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श घेऊन जगावे लागेल, तरच आपण राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. ते दत्तनगर येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. रामेश्वर भुकन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तनगर येथील श्री दत्त तरुण मंडळाने केले. या कार्यक्रमाचा लाभ स्थानिक ग्रामस्थांनी घेतला.