Menu Close

‘रस्ता रूंदीकरणासाठी पोरस्कडे, पेडणे येथील श्री माऊलीदेवी मंदिर पाडल्यास राज्यव्यापी आंदोलन !’

पोरस्कडे, पेडणे येथील श्री माऊलीदेवी मंदिराचे विश्‍वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना, गोवा सुरक्षा मंच यांची संयुक्त पत्रकार परिषद

पेडणे : राष्ट्रीय हमरस्ता १७च्या रूंदीकरणासाठी पोरस्कडे, पेडणे येथील श्री माऊलीदेवी मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी श्री माऊलीदेवी मंदिराचे विश्‍वस्त, गोवा सुरक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महामंघ यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला श्री माऊलीदेवी मंदिराचे अधिवक्ता श्री. जितेंद्र गावकर, गोवा सुरक्षा मंचचे राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलींगकर, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महामंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, श्री. जयेश थळी, सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक आदींची उपस्थिती होती.

श्री माऊलीदेवी मंदिराचे अधिवक्ता श्री. जितेंद्र गावकर पत्रकार परिषदेत म्हणाले, राष्ट्रीय हमरस्ता १७च्या रूंदीकरणाच्या वेळी आम्हाला श्री माऊलीदेवी मंदिर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले; मात्र या आश्‍वासनाचे पुढे पालन होत असल्याचे दिसले नाही. स्थानिक काही धर्मविरोधी लोक आणि स्थानिक आमदार यांनी स्थानिकांना काळोखात ठेवून कटकारस्थान रचून श्री माऊलीदेवी मंदिर पाडण्याचे ठरवले. श्री माऊलीदेवी मंदिर हे आमचे श्रद्धास्थान आहे. श्री माऊलीदेवी मंदिर पाडण्याच्या या षड्यंत्राला पोरस्कडे येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. रस्ता रूंदीकरणासाठी श्री माऊलीदेवी मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थांचा संयम सुटू शकेल. आम्ही श्री माऊलीदेवी मंदिराचा भाग कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही.

प्रा. सुभाष वेलींगकर या वेळी म्हणाले,पत्रकार परिषदेत मंदिररक्षणाच्या सूत्रावरून अनेक विचारधारेचे लोक एकत्र आलेले आहेत. श्री माऊलीदेवी मंदिर हे एक पुरातन मंदिर आणि पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने याला महत्त्व आहे. श्री माऊलीदेवी मंदिराच्या रक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल.

श्री. जयेश थळी म्हणाले, पोर्तुगीज काळातही या मंदिराचे आमच्या पूर्वजांनी रक्षण केले. हा वारसा असाच पुढे चालू ठेवायचे दायित्व आपले आहे.

गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महामंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक यांनी श्री माऊलीदेवी मंदिर रक्षणाच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य तथा पत्रकार जवाहर बर्वे यांना मंदिर विश्‍वस्तांनी दिले सडेतोड उत्तर !
श्री माऊलीदेवी मंदिरासाठी सनातन संस्थेचा प्रारंभापासून पाठिंबा !

पत्रकार परिषदेला गोवा ३६५ या वृत्तवाहिनीचे पत्रकार तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य जवाहर बर्वे यांचीही उपस्थिती होती. पत्रकार परिषदेच्या शेवटी जवाहर बर्वे यांनी आयोजकांना प्रश्‍न केला की, सनातन संस्था ही एक वादग्रस्त संस्था असतांनाही तुम्ही या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा कसा काय घेतला ? (सनातन संस्था वादग्रस्त असल्याची अंधश्रद्धा बाळगणारे जवाहर बर्वे ! यालाच सनातनद्वेष म्हणतात ! जनतेला सनातन संस्था आधार वाटते, तर डोळ्यांवर सनातनद्वेषाची झापडे बांधलेल्यांना सनातन संस्था वादग्रस्त वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) यावर श्री माऊलीदेवी मंदिराचे अधिवक्ता श्री. जितेंद्र गावकर म्हणाले, श्री माऊलीदेवी मंदिराच्या रक्षणासाठी संपूर्ण गोमंतकातून जे कोणी साहाय्यासाठी येणार आहेत, त्यांना आम्ही समवेत घेणार आहोत. श्री माऊलीदेवी मंदिरासाठी सनातन संस्थेने प्रारंभीपासून आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *