हिंदु संघटनांकडून निषेध आणि विद्यालय प्रशासनावर कारवाईची मागणी
काणकोण (गोवा) : केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला आहे. या प्रकाराचा हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला आहे. केंद्रात आणि राज्यांत हिंदुत्वनिष्ठ विचारांचे शासन असतांना हिंदूंच्या सणांच्या दिवशी परीक्षा ठेवली जाते, हे निंदनीय आहे. या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन काणकोण, गोवा येथील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिमेश पाल यांनाही देण्यात आले आहे.
गोवा येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद लोलयेकर, नववर्ष स्वागत समिती पैंगीणचे श्री. काशिनाथ वझे, श्री मारुति मंदिर, चावडीचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण देसाई उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, ‘गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांसाठी महत्त्वाचा सण आणि हिंदु नववर्षारंभ दिन आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. या दिवसाला आध्यात्मिकच नव्हे, तर नैसर्गिक आणि ऐतिहासिकही महत्त्व आहे. या दिवशी देशभरातील कोट्यवधी हिंदू गुढी उभारून त्याचे पूजन करतात. देशभरात हिंदु नववर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य शोभायात्रा आयोजित करून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले जाते. याच दिवशी प्रवेशपरीक्षा असल्याने हिंदु विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या दिवसाचा लाभ घेता येत नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचे कार्य देशातील ३४ राज्यांत असून या विद्यालयांत शिकणारे आणि प्रवेश घेणारे सहस्रो विद्यार्थी हिंदू आहेत. अशा प्रकारे ‘ईद’ या मुसलमानांच्या धार्मिक सणाच्या दिवशी किंवा ‘ख्रिसमस’ या ख्रिस्त्यांच्या धार्मिक सणाच्या दिवशी अशी परीक्षा ठेवली असती का ?, असा प्रश्नही समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
सणाच्या दिवशी अशा प्रवेशपरीक्षा ठेवल्याने हिंदु विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प होईल आणि अन्य धर्मीय मुलांना सहज प्रवेश मिळेल, असा कुटील हेतू यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विद्यालय प्रशासनाने ६ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवलेली प्रवेश परीक्षा तात्काळ रहित करून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि हा निर्णय घेणार्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वेळी करण्यात आली.
‘गुड फ्रायडे’ किंवा ‘रमझान’ या दिवशी अशा परीक्षा ठेवल्या जातात का ? – श्रीकृष्ण देसाई
या वेळी श्री. श्रीकृष्ण देसाई यांनी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाल यांना विचारले, ‘‘नववर्षदिन हा हिंदु धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण असूनही या दिवशी प्रवेशपरीक्षा ठेवून विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय करण्यात आला आहे. अशा परीक्षा ‘गुड फ्रायडे’ किंवा ‘रमझान’ या दिवशी ठेवल्या जातात का ?’’
(म्हणे) ‘गुढीपाडव्याला प्रवेशपरीक्षा घेण्यास कोणीही विरोध दर्शवला नाही !’ – अनिमेश पाल, प्राचार्य, नवोदय विद्यालय
नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अनिमेश पाल म्हणाले, ‘‘प्रवेशपरीक्षेला अनुसरून मडगाव येथे २९ मार्चला माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीत प्रवेशपरीक्षेला अनुसरून कोणीही विरोध दर्शवला नाही, तसेच कोणत्याही पालकाने या प्रवेशपरीक्षेला विरोध दर्शवलेला नाही. (इतर धर्मीय त्यांच्या सणांच्या वेळी निवडणुका ठेवल्या, तरी त्वरित विरोध दर्शवून ‘अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, असे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. याउलट हिंदू त्यांच्या सणाच्या दिवशी पाल्याची परीक्षा ठेवल्यावर त्याला साधा आक्षेपही घेत नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना सणांचे महत्त्वच समजलेले नाही. असे असले, तरी विद्यालयाच्या प्राचार्यांना ही गोष्ट का समजली नाही ? – संपादक) प्रवेशपरीक्षेच्या वेळापत्रकाविषयी शिक्षण सचिवांनाही कळवण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवीन.’’