मुंबई : भाजप-शिवसेना यांनी मिळून ३० वर्षे कुणाशी संघर्ष केला, ते अधिक लक्षात ठेवा. त्या वेळी देशात काय वातावरण होते हे आठवा. ‘हिंदु’ शब्द म्हणणे हा गुन्हा ठरत होता. ‘हिंदुत्व’ ही शिवी होती. त्या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत राहिलो, तर ‘देवाने दिले आणि कर्माने नेले’, असे होईल. हा कर्मदरिद्रीपणा ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. २ एप्रिल या दिवशी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी श्री. उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ‘भाजप-शिवसेना युती किती दिवस टिकेल ?’, या प्रश्नावर श्री. ठाकरे यांनी वरील उत्तर दिले. या वेळी ‘भाजप-शिवसेना हे नाते दीर्घकाळ टिकेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले,
- माझे काही चुकले असल्यास ते दाखवून दिले, तर ते स्वीकारून मी सुधारणा करेन; मात्र आता दोन हिंदुत्वनिष्ठ पक्ष एकत्र आले नसते, तर भविष्यात ते कधी झाले नसते.
- देशाने काँग्रेसला ६० वर्षे दिली, तर युतीला ५ वर्षे दिली. युतीच्या कालावधीत अनेक चांगल्या योजना राबवण्यात आल्या.
- आम्ही कधी जुमलेबाजी करत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून माझी अपेक्षा आहे की, अवाजवी आश्वासने देऊ नयेत, जेणेकरून लोकांची स्वप्ने धुळीला मिळतील.
- माझा मित्र चुकत असेल, तर चूक मी लक्षात आणून देईन; म्हणून ‘मी त्याचा विरोधक आहे’, असे कुणी मानले, तर ते दुर्दैव आहे.
- विरोधकांमध्ये पंतप्रधान पदासाठी एकही चेहरा नाही. पंतप्रधानपदी आता तरी मोदी यांच्याऐवजी दुसरे कुणी बसवावे, अशी वेळ आलेली नाही.
राममंदिराच्या उभारणीला गती न मिळाल्यास पुन्हा अयोध्येत जाईन !
राममंदिर हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. शिवसेना अयोध्येत गेल्यामुळे सरकारला राममंदिर विषयीची भूमिका स्पष्ट करायला लागली. न्यायालयीन कामकाज चालू झाले. राममंदिराच्या उभारणीला गती न मिळाल्यास पुन्हा अयोध्येत जाईन, असे या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात