वाराणसी येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्याकडून याचिका
- धर्मरक्षणासाठी कृतीशील असणारे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन !
वाराणसी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी २० मार्च या दिवशी काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या ख्रिस्ती असल्याने त्यांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी मंदिर प्रशासनाला निवेदन देऊन केली होती. तरीही त्यांना प्रवेश देण्यात आल्याने अधिवक्ता त्रिपाठी यांनी प्रियांका वाड्रा यांच्या विरोधात केलेल्या याचिकेवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्रिपाठी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, प्रियांका वाड्रा यांची ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्या काशी विश्वेश्वराचे दर्शन किंवा पूजा करू शकत नाहीत. त्यांनी मंदिरात पूजा करून मंदिराला अपवित्र केले आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच त्या मांसाहारीही आहेत.
न्यायालयाने ही याचिका मान्य केली असून यापुढील सुनावणी १२ एप्रिलला होणार आहे. प्रियांका वाड्रा यांच्या विरोधात भा.दं.वि.च्या कलम ४१९, २९५, २९५ अ आणि १७१ एच् अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच प्रियांका वाड्रा यांच्यासह मंदिराचे पुजारी राजन तिवारी यांच्या विरोधातही खटला प्रविष्ट केला आहे. तिवारी यांनी प्रियांका वाड्रा यांना पूजा करण्यासाठी साहाय्य केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात