Menu Close

हिंदु विधीज्ञ परिषदेने केला कोल्हापूर महापालिकेतील ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड

कारवाई करण्याची हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. बाबासाहेब भोपळे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता समीर पटवर्धन आणि श्री. किरण दुसे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. ज्याला ‘तसलमात’ असे म्हटले जाते. याविषयी घेतलेल्या रकमेचा विनियोग काय झाला ?, त्याचा तपशील आणि पुरावे, उदा. देयके जमा करणे अन् उरलेली रक्कम जमा करणे कायद्याने बंधनकारक असते. ‘आधीच्या तसलमातीचा हिशेब जमा केल्याशिवाय नवीन आगाऊ रक्कम उचलता येत नाही’, असा कायदा असूनही कित्येक वर्षे ना हिशेब दिला आहे, ना रकमा जमा केल्या आहेत. सदर रक्कम ३१ मार्च २०१८ या दिवशी ७ कोटी १ लाख ५४ सहस्र ८४४ रुपये इतकी प्रचंड असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीतून उजेडात आले.

वर्ष १९५१ पासूनच्या सहस्रो रुपयांच्या रकमा यात प्रलंबित आहेत. या रकमा वसूल करण्यासाठी वर्ष २०१५ मध्ये विभागप्रमुखांना पाठपुराव्याची पत्रे पाठवण्यात आली; परंतु त्यापुढे काहीही करण्यात आलेले नाही. खरेतर पगारातून कापून घ्यायच्या रकमा या व्याजासह असल्या पाहिजेत. याशिवाय संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. असे काहीही न होता हा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला, म्हणजेच यात गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या प्रकरणी आम्ही हा विषय जनतेसमोर घेऊन येत आहोत. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी अन्यथा आम्ही फौजदारी कारवाई करू. वेळ पडलीच तर जनआंदोलन उभारू, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, तसेच श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

कोल्हापूर महानगरपालिकेतील घोटाळ्यांची काही उदाहरणे

  • कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी ७ सहस्र ५०० रुपयांच्या जिलेबीचे वाटप करण्यात आले. याची रक्कम आगाऊ घेतली. मुळात पालिका तोट्यात असतांना इतकी जिलेबी कशाला लागते ?
  • कर्मचार्‍यांना वैद्यकीय कारणांसाठी ज्या आगाऊ रकमा दिल्या आहेत, त्यातील केवळ वर्षभराची आकडेवारी पाहिली, तर सर्वांना एकतर कर्करोग किंवा हृदयविकाराचा त्रास झाला आहे. त्या रकमाही एकतर १ लाख ३० सहस्र रुपये किंवा १ लाख ५० सहस्र रुपये अशा ठरलेल्या आहेत.
  • रंकाळा येथील जलपर्णी काढणे आणि स्वच्छतेच्या नावाखाली साधारण वर्ष २००७ पासून आतापर्यंत ८ लाख १७ सहस्र ७७० रुपये खर्च दाखवला आहे; पण त्यांची देयके अद्याप जमा केलेली नाहीत. यातून हा खर्च खरेच झाला होता का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे हा अपहार आहे का ?, हे तपासणे आवश्यक आहे.
  • कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी (के.एम्.टी.) १ कोटी १५ लाखांहून अधिक रुपयांचा खर्च असाच ‘दाखवला’ गेला आहे.
  • विविध न्यायालयीन कामकाजांसाठी ६५ सहस्र रुपयांचा खर्च विनापुरावा दाखवण्यात आला आहे.
  • पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी १० मासांमध्ये सरासरी १ कोटी ८५ सहस्र रुपयांवर खर्च झालेला आहे.
  • पंढरपूरच्या वारीसाठी माधवी दिगंबर मसूरकर यांना ८.७.२०१६ या दिवशी २५ सहस्र रुपये, तर तानाजी शामराव मोरे या कर्मचार्‍याला ‘महापौर फूटबॉल चषका’साठी १८.२.२०१७ या दिवशी ५० सहस्र रुपये दिलेले आहेत.
  • जानेवारी २०१८ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ३५ सहस्र रुपयांची आगाऊ रक्कम घेतली आहे.
  • मंत्रालयातील सचिवांच्या दौर्‍यासाठी २६.१०.२०१७ या दिवशी १० सहस्र रुपये खर्च दाखवला आहे.

व्यक्तीच्या नावाने आगाऊ रकमांच्या नोंदीतही घोटाळा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

साधारण वर्ष २०१४ पर्यंत व्यक्तीला दिलेल्या रकमांचीसुद्धा वसुली अत्यंत किरकोळ झालेली आहे. वर्ष २०१६ नंतर थोडी अधिक प्रमाणात वसुली झाली असली, तरी आधीच्या वसुलीविषयी काहीही करण्यात आलेले नाही. वर्ष २००७ पर्यंत महानगरपालिका विभागाच्या नावाने आगाऊ रकमांचा हिशेब ठेवत होती. त्या काळापर्यंत ३ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम वसूल होणे किंवा त्यांच्या खर्चांचे पुरावे येणे प्रलंबित होते. वर्ष २००७ नंतर मात्र व्यक्तीच्या नावाने आगाऊ रकमांची नोंद ठेवणे चालू करण्यात आले. यात अनेक घोटाळे आहेत, असे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी या वेळी सांगितले.

भ्रष्टाचारविरोधी लढा यापुढेही चालूच राहील ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

गेल्या ७१ वर्षांत देशात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार किती मुरला आहे, हेच दिसून येते. भ्रष्ट नेते, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशांचा दुरुपयोग करतात. आम्ही हे प्रकरण योग्य मार्गाने लावून धरू. आम्ही हा भ्रष्टाचारविरोधी लढा आरंभला असून तो यापुढेही चालूच राहील.

भ्रष्टाचाराची प्रकरणे निदर्शनास आल्यास हिंदु विधीज्ञ परिषदेशी संपर्क करा !

अशा प्रकारे भ्रष्टाचाराची प्रकरणे निदर्शनास आल्यास अथवा अशा गोष्टींची माहिती कोणाकडे असल्यास हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना कागदपत्रांसह संपक क्र. ९५९५९८४८४४ वर संपर्क करावा, असे आवाहनही अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी या वेळी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *