उत्तर भारतात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या उपक्रमांना हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेशातील दिवाणी न्यायालयात अधिवक्त्यांसाठी बैठकीचे आयोजन
सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्यांसाठी नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्त्यांना संबोधित केले. आज धर्मग्लानीने परमोच्च क्षण गाठला आहे. आज असे कुठलेच तंत्र राहिलेले नाही, जे सत्यासाठी लढा देत आहे. भारताचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ एक प्रकारे पराभूत झाले आहे, असे उद्गार श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी बोलतांना काढले. श्री. राजहंस पुढे म्हणाले की, आज हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना संघटित करण्यामध्ये धर्मनिष्ठ अधिवक्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
सिद्धार्थनगर संपर्क अभियानाच्या अंतर्गत सिद्धार्थनगर जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात अधिवक्त्यांसाठी बैठक घेण्यात आली. अधिवक्ता धरणीधर पांडेय यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रामसूरत यादव, रामेंद्र मोहन मिश्रा, प्रमोद कुमार दुबे, विनोद कुमार उपाध्याय, गिरजेश उपाध्याय आणि उमाशंकर पांडेय या अधिवक्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. या बैठकीला एकूण २२ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता उपस्थित होते. त्यांनी स्थानिक अधिवक्त्यांसाठी प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षण वर्ग आयोजित करण्याची मागणी केली.