साधना शिबिरातील विषयांमुळे, तसेच तेथील आनंददायी आणि चैतन्यमय वातावरणामुळे धर्माभिमानी प्रभावित !
करिमनगर : तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात २३ मार्च २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी साधना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १० धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी श्री. चेतन गाडी, सौ. तेजस्वी वेंकटपुर, सौ. विनुता शेट्टी यांनी साधनेचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठीचे प्रयत्न, नामजपाचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यावरील उपाय, प्रार्थनेचे महत्त्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. साधना शिबिरातील विषयांमुळे, तसेच तेथील चैतन्यमय वातावरणामुळे धर्माभिमानी प्रभावित झाले.
क्षणचित्रे
- धर्माभिमानी श्री. चंद्रशेखर यांना ताप होता, तरी ते शिबिराला दिवसभर उपस्थित होते. दुपारपर्यंत त्यांचा ताप उतरला होता. ‘शिबिरातील चैतन्यामुळे हे साध्य झाले’, अशी त्यांनी स्वत:ची अनुभूती सांगितली.
- धर्माभिमानी श्री. रामकृष्ण यांनी अर्धा दिवसच शिबिरामध्ये उपस्थित रहाणार असल्याचे कळवले होते. दुपारनंतर ते कार्यालयात जाणार होते; परंतु शिबिरातील विषय ऐकल्यानंतर त्यांनी पूर्ण दिवसाची सुट्टी घेतली आणि पूर्ण दिवस उपस्थित राहिले.
- धर्माभिमानी श्री. वेंकटाचारी यांची एका पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिबिराला उपस्थित रहाण्याविषयी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. शिबिराच्या आदल्या रात्री कार्यक्रम रहित झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. त्यामुळे त्यांना शिबिराला उपस्थित रहाणे शक्य झाले. त्यांच्यासाठी ती एक मोठी अनुभूती होती.
- शिबिराच्या प्रारंभी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमांना वाहिलेले फुलांचे हार रात्री ९ वाजेपर्यंत ताजे टवटवीत होते. शिबिरामध्ये प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अस्तित्वाची सर्वांनी अनुभूती घेतली.
- शिबीर मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. त्याठिकाणी आलेल्या एका जिज्ञासूने शिबिरातील विषय ऐकला. शिबिराच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘मी गेल्या २० वर्षांत अनेक चुका केल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्यातील अहंची मला जाणीव झाली. उपायांचे महत्त्व लक्षात आले.’ त्यांनी उपायांचे साहित्यही विकत घेतले.