हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
मुंबई : हिंदु जनजागृती समितीने गुढीपाडव्याच्या संदर्भात सत्य इतिहास आणि गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारा साडेचार मिनिटांचा एक प्रबोधनात्मक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. काही धर्मविरोधकांकडून या व्हिडिओतील केवळ एका युवकाच्या तोंडी असणार्या चुकीचा इतिहास सांगणार्या वाक्यांचा ध्वनी (ऑडिओ) ‘सत्य इतिहास’ असे नाव देऊन ‘टिकटॉक’ अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले. या द्वेषमूलक कृत्यानंतर आलेल्या विरोधी प्रतिक्रियांनंतर हा ऑडिओ या अॅपवरून काढून टाकण्यात आला आहे. ‘या संदर्भात कॉपी राईट हक्काचा भंग केल्याविषयी हिंदु जनजागृती समिती अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे’, असे त्यांनी कळवले आहे.
- हिंदु जनजागृती समितीने केलेल्या या व्हिडिओमध्ये एक युवक म्हणतो, ‘‘गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे हालहाल करून त्यांना ठार मारले आणि त्याचाच आनंद म्हणून महाराजांच्या विरोधकांनी घरात गुढ्या उभारल्या.’’
- त्यानंतर दुसरा युवक सत्य इतिहास सांगून त्याचे प्रबोधन करतो. ‘‘प्रभु श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परत आल्यावर त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या. रामायण सहस्रो वर्षांपूर्वी घडले आहे, तर संभाजी महाराजांचा इतिहास साडेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे’’, हे सांगून पुढे गुढीपाडव्याचे महत्त्वही यातील युवक सांगतो आणि तेथे उपस्थित सर्व युवकांना सत्य इतिहास कळतो अन् गुढीपाडव्याचे महत्त्वही लक्षात येते, असा प्रसंग या ‘व्हिडिओ’मध्ये चित्रित करण्यात आला आहे.
- काही धर्मविरोधकांनी केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातील चुकीच्या इतिहासाची वाक्ये घेऊन त्या माध्यमातून असत्य इतिहासाचा अपप्रचार चालू केला. त्यानंतर त्यावर इतरांनी काही सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.