Menu Close

प्लास्टिक कचरा, इमारतीचे टाकाऊ साहित्य यांपासून सिद्ध केलेल्या धर्मशास्त्रविसंगत गुढ्यांची विक्री करणार !

‘इकोफ्रेण्डली’ गुढीच्या नावाखाली ‘निवेदिता प्रतिष्ठान’ची धर्मशास्त्रविसंगत कृती

  • अशास्त्रीय आवाहनाला बळी न पडता धर्मशास्त्राप्रमाणे गुढीपाडवा साजरा करून धर्मकर्तव्य बजावा !
  • गुढी उभारण्यामागे असलेले धर्मशास्त्र जाणून न घेता हिंदूंमध्ये अशास्त्रीय कृती पसरवून त्यांची दिशाभूल करणारे असे हिंदू हेच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत ! अन्य पंथीय त्यांचे सण किंवा उत्सवांच्या वेळी ‘इकोफ्रेण्डली’चे कधी स्तोम माजवतात का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.

मुंबई : गुढीपाडवा कसा साजरा करावा, हे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले असूनही अध्यात्मशास्त्राला डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने ‘इकोफ्रेण्डली गुढी’ सिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्लास्टिक कचरा, इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ साहित्य यांचा वापर करण्यात आला आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘पर्यावरणपूरक इकोफ्रेन्डली गुढी’, या नावाने प्रचार करून या गुढ्या खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दादर येथील ‘दादर भगिनी समाज मंडळा’च्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या प्रांगणात या गुढीचा लोकार्पण सोहळा झाला. सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाठवलेल्या संदेशामध्ये ‘निवेदिता प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी म्हटले आहे, ‘‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने यंदा पर्यावरणपूरक ‘इकोफ्रेण्डली’ गुढीची निर्मिती करून निसर्गपूजनात यशस्वी पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प आहे. ‘प्लास्टिक कचरामुक्त वसुंधरा व्हावी, या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून हा उपक्रम राबवत आहोत.’’

(म्हणे) ‘कचर्‍यामध्येही देव आहे, त्याचा अपमान करू नका’, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे ! – प्रशांत परांजपे, संस्थापक अध्यक्ष, निवेदिता प्रतिष्ठान

याविषयी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने ‘निवेदिता प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘या गुढीमध्ये पाट आणि गुढीची काठी प्लास्टिक अन् टाकाऊ साहित्यापासून करण्यात आली आहे. याचा मुख्य हेतू रोजगारनिर्मिती आणि कचरा निर्मूलन, हा आहे. निसर्गाला अनुकूल असा हा प्रकल्प आहे. (कचर्‍याची समस्या सोडवण्यासाठी गुढी, हे एकच माध्यम आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आपण निसर्गाचे चक्र पूर्ण करत नाही. प्लास्टिक टाकून देऊन आपण हे निसर्गचक्र मध्येच तोडतो. ‘या टाकण्यात येणार्‍या वस्तू हा कचरा नाही’, हे आम्हाला समाजमनावर बिंबवायचे आहे. ‘प्रत्येक वस्तू पूजनीय आहे. प्रत्येक वस्तूचा आदर करायला पाहिजे. निसर्गाला देव माना म्हणजे प्रत्येक गोष्टीत देव दिसेल. देव मानण्यावर आहे. आम्हाला कचर्‍यातही देव दिसतो. त्याचा अपमान करू नका’, हा आमचा संदेश आहे.’’(‘इकोफ्रेण्डली गुढी’सारख्या अशास्त्रीय प्रकाराला थारा न देणे, हे प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूचे कर्तव्य आहे. हिंदूंनी स्वत: धर्मशिक्षण घेऊन आपल्या समाजबांधवांना धर्मशिक्षण दिल्यास असे प्रकार घडणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *