Menu Close

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुढीपाडवा उत्साहात !

  • हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा यांचा शोभायात्रांमध्ये सहभाग
  • हिंदु जनजागृती समिती सामूहिक गुढी पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी !
  • मुंबईसह महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने उत्साहात हिंदु नववर्षारंभ साजरा !
  • छोटे चित्ररथ सर्वांचे आकर्षणाचे केंद्र !
  • पारंपरिक वेशभूषा आणि फेटे यांनी सर्वत्र मराठमोळे वातावरण !
  • लेझीम नृत्य आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका !
  • भगवे ध्वज फडकवून हिंदूंच्या नववर्षाला मानवंदना !
नवी मुंबई

मुंबई : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी (६ एप्रिल) मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे या परिसरात पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. गिरगाव, दादर, डोंबिवली आदी ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रा लक्षवेधी ठरल्या. या ठिकाणी नववर्षस्वागत यात्रेसाठी चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवे ध्वज, पारंपरिक पोषाख, पारंपरिक वाद्ये आदींसह आबालवृद्धांनी उत्साहाने हिंदु नववर्षाचे स्वागत केले.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे विविध ठिकाणी स्थानिक मंडळे अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि रणरागिणी शाखा सहभागी झाल्या होत्या. काही ठिकाणी सामूहिक गुढी उभारण्याच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबई आणि पालघर येथे सामूहिक गुढीपूजनात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन !

माहीम येथील नवयुग मित्रमंडळाच्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

माहीम येथील नवयुग मित्रमंडळाच्या वतीने मच्छिमारनगर ते शिवाजी पार्क अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अपप्रचाराला बळी न पडता नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशीच साजरे करा ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. काही ब्रिगेडी मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा संदर्भ देऊन गुढीपाडवा साजरा न करण्याचे आवाहन करतात. ही मंडळी हिंदूंना संभ्रमित करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशीच साजरे करा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरखैरणे आणि खारघर येथे सामूहिक गुढीपूजन

कोपरखैरणे

कोपरखैरणे

नवी मुंबई – अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागतयात्रेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या महिला सहभागी झाल्या होत्या. नवी मुंबईमध्ये वाशी, सानपाडा, ऐरोली आदी ठिकाणी नववर्षानिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांनी शोभायात्रा काढल्या होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध संघटना आणि धर्माभिमानी हिंदू यांच्यासह कोपरखैरणे येथील श्री चिकणेश्‍वर मंदिर आणि खारघर येथील दुर्गामाता मंदिराच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामूहिक गुढी उभारण्यात आली होती. कोपरखैरणे येथील चिकणेश्‍वर मंदिरात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी, सनातन प्रभातचे वाचक आणि भाविक यांनी एकत्र येत सामूहिक गुढीपूजन केले. कार्यक्रमाचे यजमानपद मंदिराचे विश्‍वस्त श्री. निलेश पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी भूषवले. ‘‘सार्वजनिक गुढीपूजन करून वेगळाच आनंद मिळाला. असेच एकत्र यायला हवे’’, असे मत श्री. निलेश पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

गुढीपाडव्याच्या शुभदिनी धर्माचरण करून राष्ट्ररक्षणार्थ संघटित होण्यासाठी धर्माभिमान्यांनी निर्धार केला. या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री अजय बर्गे, भरत माळी, धर्माभिमानी हिंदू सर्वश्री नंदकिशोर गोस्वामी, बी.डी. गौडा, गिरीश गुप्ता, रामकुमार शर्मा, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कुंटले, कोपरखैरणे येथील श्री. चिकणेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त निलेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवी पाटील सहभागी झाले होते.

बोईसर, सरावली आणि डहाणू (जिल्हा पालघर) येथे जल्लोषात नववर्ष स्वागतफेरी  !

नववर्षानिमित्त पालघर जिल्ह्यातील बोईसर, सरावली आणि डहाणू येथे वेगवेगळ्या संघटनांनी स्वागतफेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दैनिक सनातन प्रभातच्या गुढीपाडवा विशेषांकाचे वितरण करण्यात आले. तसेच हिंदूंना शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार हे या सर्व ठिकाणी फेरीसाठी उपस्थित होते. श्री. सागर चोपदार यांनी डहाणू येथील शोभायात्रेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील आघात रोखण्यासाठी प्रयत्न करूया ! – सागर चोपदार, मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी जोमाने साधना करण्याचा संकल्प करूया. आजच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण करण्याचा संकल्प करूया. जे करत आहेत त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करूया. तसेच हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्मावर होणारे आघात सनदशीर मार्गाने रोखण्यासाठी प्रयत्न करूया.

बोईसर आणि बोरीवली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन

बोईसर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीराम मंदिर येथे सामूहिक गुढी उभारण्यात आली. या ठिकाणी श्री. सागर चोपदार यांनी देशकालकथन करून सर्वांना नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी सर्वश्री शंकर कापसे, चंद्रप्रकाश आदिवाल, चंद्रकांत शर्मा, विनोद वाजपेयी, शुक्ला आदींसह अन्य धर्मप्रेमी आणि सनातन प्रभातचे वाचक येथे उपस्थित होते.

बोरीवली येथे श्रीकृष्ण को-ऑपरेटिव्ह हौऊसिंग सोसायटी येथे करण्यात उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भूषण देवरूखकर यांनी शास्त्रानुसार गुढीचे पूजन केले. या ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये स्थानिक हिंदु बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

ठाणे येथील फेरीत हिंदु जनजागृती समितीची स्वरक्षण प्रात्यक्षिके ठरली विशेष आकर्षण !

ठाणे जिल्ह्यात हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्ह्यात हिंदु नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ तसेच जिल्ह्याच्या अन्य भागांत नववर्षानिमित्त स्वागतयात्रा काढण्यात आल्या होत्या. ठाण्यात कौपिनेश्‍वर न्यासाच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत कौपिनेश्‍वराची पालखी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. तसेच विविध मान्यवर या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. ही स्वागतयात्रा जांभळी नाका, तीन पेट्रोल पंप, गोखले रोड, राम मारुती रस्ता या मार्गे येऊन तलावपाळी येथे फेरीची सांगता करण्यात आली. या स्वागतयात्रेत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्थांचे ५० हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. पारंपरिक पोशाख परिधान करून पुरुष आणि महिला यात सहभागी झाल्या होत्या, तसेच दुचाकीवर फेरीत महिलाही सभागी झाल्या होत्या. ठाण्यातील चौकाचौकांतून या स्वागतयात्रेचे ठाणेकर स्वागत करत होते. फेरीच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

ठाणे शहरातील स्वागतयात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

  • फेरीत रामनामाचा गजर !
  • प्रात्यक्षिकांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद !
  • दैनिक सनातन प्रभातचा चित्ररथ !

गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेत हिंदु जनजागृती समितीनेही सहभाग घेतला होता. श्रीरामाची प्रतिमा असलेला छोटा चित्ररथ घेऊन मार्गक्रमण करण्यात आले होते. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामाचा गजर संपूर्ण फेरीत करण्यात येत होता. समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने अनेक महिला पारंपरिक वेशभूषेत फेरीत सहभागी झाल्या होत्या.

समितीच्या वतीने विनामूल्य घेण्यात येणार्‍या स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके आणि प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली. ही प्रात्यक्षिके दाखवतांना उत्स्फूर्तपणे शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या. रणरागिणी शाखेच्या महिलांची स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. स्वरक्षण प्रात्यक्षिके बघितल्यावर समाजातील लोकांकडून स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

डोंबिवलीत स्वागतयात्रेत मतदानासाठी प्रबोधन !

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये शोभायात्रेचे विशेष महत्त्व आहे. येथील भागशाळा मैदानापासून शोभायात्रा चालू झाली. डोंबिवली शहरातील विविध भागात फिरून फडके रोड येथे शोभायात्रेची सांगता झाली. फडके रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते. विविध सामाजिक, आध्यात्मिक संस्थांचे चित्ररथ लोकांचे विशेष आकर्षण ठरले.

लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी जनजागृती करण्याचे संदेशही या स्वागतयात्रेत झळकतांना दिसत होते. ढोल-ताशांचा नाद, एका तालात नाचवले जाणारे ध्वज आणि पारंपरिक पोशाखासह भगवे फेटे बांधून डोंबिवलीकर शोभायात्रेत सहभागी झाले होते. जुना बुधवार पेठ मर्दानी आखाडा हे कोल्हापूर येथील शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देणार्‍या केंद्राचे पथक डोंबिवली येथील स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. असाच उत्साह कल्याण आणि जिल्ह्यातील अन्य भागांतही पहायला मिळाला.

अंबरनाथ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन

गावदेवी मंदिर कानसई, अंबरनाथ (पू) येथे समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. या वेळी वाचक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते. यानिमित्ताने गुढी उभारण्याचे शास्त्र समजावून सांगण्यात आले. तसेच येणार्‍या-जाणार्‍या महिलांना धर्मप्रेमी महिला गुढी उभारण्याचे महत्त्व सांगत होत्या.

ठाणे येथे स्वागतयात्रेत दैनिक सनातन प्रभातचा चित्ररथ सिद्ध करण्यात आला होता. त्या चित्ररथावर दैनिकाच्या विविध आवृत्त्यांचे आणि दैनिक सनातन प्रभातमधील लिखाणाचे फलक लावण्यात आले होते. ‘वाचा हो वाचा सनातन प्रभात…….!’ या गीताच्या ध्वनीफीतीच्या माध्यमातून समाजातील लोकांना वर्गणीदार होण्यासाठी आणि धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.

नाशिक येथे स्वागतयात्रा जल्लोषात

गुढीपाडव्याच्या निमित्त शहरातील विविध भागांतून शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी ५.३० वाजता जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळ नाशिकच्या वतीने पंचवटी येथे, गंगापूर रोड, इंदिरा नगर, तिडके कॉलनी, कॅनडा कॉर्नर, भद्रकाली अशा विविध ठिकाणी हिंदु नववर्षानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येथील विविध हिंदुत्वनिष्ठ मंडळांनी विविध भागांत शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले. या वेळी तरुणाई आणि महिला यांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

यवतमाळ येथे नववर्षाच्या निमित्ताने सामूहिक गुढीपूजन आणि वाहनफेरी

यवतमाळ – ‘शिवसमर्थ ढोलताशा पथक’, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, विश्‍वमांगल्य सभा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने सकाळी शहरांमध्ये वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. वाहनफेरीची सांगता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे करण्यात आली. त्यानंतर येथे ५० फूट उंच सामूहिक गुढी उभारण्यात आली, त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी गुढीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. या वेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सिंधी समाजाच्या वतीने वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

नंदुरबार तालुक्यातील वावद आणि ढंढाणे येथे सामूहिक गुढीचे आयोजन !

वावद (नंदुरबार)

वावद (नंदुरबार)

नंदुरबार – तालुक्यातील वावद आणि ढंढाणे या गावांत सामूहिक गुढी उभारण्याचे नियोजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘गुढीपाडव्याचे शास्त्रीय महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. वावद येथे १०० हून अधिक, तर ढंढाणे येथे ४० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. वावद येथे श्री. सुदाम पाटील यांनी, तर ढंढाणे येथे श्री. नाना ओगले यांनी गुढीपूजन केले. गुढीपूजनाचे पौरोहित्य सौ. निवेदिता जोशी यांनी केले.

क्षणचित्रे

१. वावद येथील तरुणांनी गावात दवंडी देऊन सर्वांना निमंत्रण दिले.

२. दोन्ही गावांतील सामूहिक गुढीचे आयोजन धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी केले.

३. वावद येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लुळे यांनी स्वत: मंदिर परिसरात रांगोळ्या काढून सर्वांना रांगेत उभे केले.

४. वयोवृद्धांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.

भुसावळ येथे समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने उभारली सामूहिक गुढी !

भुसावळ (जळगाव) – येथे श्री अष्टभुजा देवीच्या मंदिरासमोर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारण्यात आली. तसेच अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याची शपथ घेण्यात आली.

पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *