तुळजापूर : हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मप्रेमींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवीला साकडे घातले. साकडे घातल्यानंतर श्री देवीची महाआरती करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, अशी घोषणा दिली.
या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. विश्वजित नवगिरे, श्री. योगी कुंटाफळे, धर्माभिमानी तथा पुजारी श्री. नागनाथ भिसे, ‘श्री शंभुराजे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. परीक्षित साळुंके, ‘श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे श्री. दिनेश धनके, प्रखर धर्मप्रेमी श्री. विजय भोसले, श्री. अलोक शिंदे, पुजारी श्री. आदित्य बोधले, तसेच सनातन संस्थेचे श्री. उमेश कदम, श्री. कौस्तुभ जेवळीकर, देवीच्या मंदिरातील पुजारी तथा हिंदु जनजागृती समितीचे सदस्य श्री. अमित कदम, हे मान्यवर उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार पूर्णत्वास नेण्यासाठी ईश्वरच साहाय्य करत आहे ! – श्री. अमित कदम, देवीच्या मंदिरातील पुजारी
या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्री. अमित कदम म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये द्रष्टेपणाने ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्वरी राज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल’, असा विचार मांडला होता. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटली; मात्र आता आपण त्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने चालू असलेल्या घडामोडी पहात आहोत. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हा विचार पूर्णत्वास नेण्यासाठी ईश्वरच साहाय्य करत असल्याचे लक्षात येते.’’