Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा हरियाणा दौरा

हरियाणात ठिकठिकाणी व्याख्याने आणि संपर्क यांद्वारे धर्मप्रेमींना साधनेविषयी, तसेच हिंदूंना धर्मबळ वाढवण्याविषयी मार्गदर्शन

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सोनिपत येथे हिंदु तरुणांसाठी मार्गदर्शन

साधनेत संयम महत्त्वाचा आणि धर्मरक्षणासाठी धर्माचा अभ्यास महत्त्वाचा !

धर्मशिक्षण नसल्याने आजचा हिंदु तरुण धर्माची बाजू मांडतांना शास्त्रशुद्ध विवेचन करू शकत नाही. आज लोक व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करतात; मात्र हिंदूंना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार नाही. घटनेत ‘सेक्युलर’ शब्द घालून खाण्याच्या, आचरणाच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून हिंदु धर्मावर आघात करण्याचे षड्यंत्र यशस्वी केले जात आहे. हिंदु धर्माची अपकीर्ती टाळण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचा अभ्यास करून त्याचे विवेचन आवश्यक आहे. मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्र बनली पाहिजेत. आम्ही आज विज्ञान शिकतो; पण विज्ञानात प्रगती केलेली अमेरिका, इंग्लंड या देशांचे नागरिक हिंदु धर्माचा अभ्यास करू लागले आहेत. आपल्या मंदिरातील प्रसादाचे, तीर्थाचे महत्त्व हे त्यांना कळू लागले आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु धर्माचा अभ्यास कसा करावा, धर्माचे महत्त्व समाजाच्या लक्षात यावे म्हणून संशोधन करत आहेत, याचा लाभ घ्यावा, असे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सोनिपतमधील धर्माभिमानी तरुणांना संबोधित करतांना सांगितले. श्री. राकेश कुमार यांनी कुंभमेळ्यातील समितीच्या प्रदर्शनास भेट दिली होती. त्यांनीच या बैठकीचे आयोजन केले होते.

हिसारमधील धर्माभिमान्यांमध्ये हिंदुतेज जागवले !

हिंदुहितासाठी योग्य पद्धतीने घटना लागू करणे आवश्यक !

सरकार हिंदूंच्या मंदिरातील पैसा घेत आहे; पण मशिदींना मात्र कह्यात घेण्याची सरकारची सिद्धता नाही. हिंदूंची वैचारिक आणि बौध्दिक फसवणूक चालू आहे. घटना सांगते की, सर्वांना समान न्याय मिळायला हवा. असे जर आहे, तर घटना खर्‍या अर्थाने लागू करून देशात समान नागरी कायदा कार्यान्वित होण्याची आवश्यकता आहे. देशात प्रत्येक धर्मानुसार कायद्याचा अर्थ वेगळा निघतो, हे दुर्देवी आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदु धर्माला संपवण्यासाठीच वारंवार प्रयत्न झाले आहेत. हिंदु धर्म मानवाला सात्त्विकतेकडे नेतो. आज विविध वैज्ञानिक उपकरणांच्या द्वारे सात्त्विक आहार, तामसिक आहार यांतील भेद ओळखता येत आहे. यासाठी सनातन संस्था मोठ्या प्रमाणात संशोधनाचे कार्य करत आहे. रज-तमाकडून सत्त्वाकडे जाण्यासाठी साधना करणे हा एकमात्र उपाय आहे. आज वर्तमानपत्र वाचून मनात अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात. आपल्याला हिंदूंना सकारात्मकतेकडे न्यायचे आहे, असे सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले.

हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. किशन गुर्जर यांनी सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. या वेळी शहरातील अन्य धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

करनाल येथे साधनेविषयी मार्गदर्शन

आपत्काळ वेगाने जवळ येत असून साधना करण्याशिवाय मानवाला पर्याय नाही !

मंदिरांच्या विश्‍वस्तांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

येणार्‍या काळात युद्ध सीमेवर अल्प आणि देशाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लढले जाईल, अशी स्थिती निर्माण होत आहे. भारतात देशद्रोही प्रवृत्तीचे समर्थन उघडपणे करत आहेत. देशात आपापसांत मतभेद निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुष्टशक्ती कार्यरत आहे. अध्यात्माच्या व्यासपिठावर राजकारणी लोकांना प्रवेश दिला, तर धर्म आणि राष्ट्र यांची हानी मोठ्या प्रमाणात होते. अवनती होणे ही काळाची गती आहे; पण व्यक्तिगत जीवनात पतन होता कामा नये यासाठी, प्रयत्न करणे हाच पुरूषार्थ आहे. ईश्‍वरनिष्ठा ठेवून प्रयत्न केल्यास ईश्‍वर पाठीशी उभा रहातो आणि आपली अवनती होण्यापासून रक्षण करतो, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे काका यांनी करनाल शहरातील  सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेच्या विश्‍वस्तांच्या समोर मार्गदर्शन करतांना केले. या प्रसंगी धर्मशाळेचे प्रधान श्री. सुभाषचंद्र शर्मा आणि अन्य मान्यवर विश्‍वस्त उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *