जयपूर : मेकॉले शिक्षणपद्धतीने हिंदूंच्या मनातील धर्म काढून टाकण्यात आला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आजतागायत हीच शिक्षणपद्धत रेटली जात आहे. त्यामुळे उपासना, धर्माचे आचरण, धर्माची शिकवण यांपासून हिंदू दूर जात आहेत. देश आणि धर्म यांसाठी चांगल्या भावनेने काम करणारेही आज धर्माचे आचरण नसल्याने भ्रष्ट होत आहेत. हिंदूंचे तेज आज पुन्हा जागृत करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाद्वारे धर्म शिकवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते भानपूर कलां येथील ‘राहुल चंदीजा आईटीआयई महाविद्यालया’त झालेल्या कार्यक्रमात संबोधित करत होते. संघ परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला १५० युवक उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर ‘राहुल चंदीजा आईटीआयई महाविद्यालया’चे संचालक श्री. भंवरलालजी, श्री. अजय गुर्जर उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर झालेल्या शंकासमाधान सत्रात युवकांनी त्यांच्या शंका मोकळेपणाने विचारल्या.
पराक्रमी हिंदु राजांच्या जीवनातही धर्माला अनन्यसाधारण महत्त्व !
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले की, पराक्रमी राजांनीही उपासना आणि धर्म यांना प्रथम स्थान दिले. मेवाड नरेश राणा कुंभा यांनी युद्धविजयानंतर चित्तोडला उभ्या केलेल्या कीर्तीस्तंभात स्वतःची नाही, तर देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या. आमेरचा किल्ला आज ‘युनेस्को विश्व वारसा’मध्ये समाविष्ट आहे. त्याच्या संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वारावर ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय निश्चित आहे’, असे लिहिले आहे. त्यामुळे पराक्रम अवश्य करा; पण धर्माचे अधिष्ठान विसरू नका, हेच या महापराक्रमी राजांच्या चरित्रांतून आपण शिकले पाहिजे. धर्माचरण आणि साधना यांतून हे अधिष्ठान आपण मिळवू शकतो.