सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
अशी मागणी का करावी लागते ?
पणजी : पॉर्नसाइट, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांकडे १० एप्रिल या दिवशी केली. अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना या विषयीचे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गोपाळ बंदीवाड, केशव चोडणकर, सनातन संस्थेचे दयानंद मळकर्णी आणि हिंदुत्वनिष्ठ तुळशीदास चोपडेकर उपस्थित होते.
या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात महिला आणि अल्पवयीन मुले यांवरील लैंगिक अत्याचार अन् बलात्कार यांत प्रचंड वाढ झाली आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण पॉर्नसाइट, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे पहाणे हे देखील आहे, तसेच सध्या वेब सीरीजचा देखील सुळसुळाट झाला असून याद्वारेही अश्लीलता, अनैतिकता आणि गुन्हेगारी यांची परिसीमा गाठणारे चित्रण कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रसारित होत आहे. त्यामुळे अशा समाजघातकी पॉर्नसाइट, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच अशा वेब सिरीजवर निर्बंध आणावेत. या वेळी दिलेल्या अन्य एका निवेदनात म्हटले आहे की, दुधाप्रमाणेच देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या मापात फसवणे, भेसळयुक्त इंधन पुरवणे आदी गोष्टी सर्रास होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांत विविध पेट्रोल पंपांवरील डिस्पेसिंग युनिटमध्ये अवैधरित्या पालट करून मापात फसवले जात होते, तसेच पेट्रोलमध्ये भेसळ केल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशा घटनांमुळे ग्राहकांमध्ये असुरक्षितता आणि अविश्वासार्हता निर्माण झाली आहे. यासाठी पेट्रोल पंपांवर ज्या पाईपमधून पेट्रोल किंवा डिझेल वाहनामध्ये भरले जाते, तो पाईप पारदर्शक करावा. जेणेकरून त्यातून नक्की पेट्रोल जाते आहे कि नाही, हे ग्राहकांना समजू शकेल, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. ग्राहकांची फसवणूक करणार्या आणि भेसळ करणार्या पेट्रोल पंपचालकांची अनुमती रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.