भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई : मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु धर्म यांची हानी होय. त्यामुळे मद्यालये आणि बिअरबार यांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगर येथील नेवासे मतदारसंघातील भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांनी कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांनी म्हटले आहे की, हिंदु धर्मशास्त्रानुसार जेथे देवतेचे नाव असते, चित्र असते त्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची एकत्रित शक्ती कार्यरत असते. या न्यायाने जेथे देवतेचे नाव आहे, त्या ठिकाणी त्या देवतेचे अस्तित्व असते. मद्यपान करणे, हे हिंदु धर्मशास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. त्यामुळे हिंदु धर्माने वर्ज्य ठरवलेल्या ठिकाणांना देवतांची नावे देणे, हा देवतांचा घोर अनादर आहे. अशा कृतीमुळे घोर पाप लागते. राज्यातील जी मद्यालये आणि बिअरबार यांच्या नावांमध्ये देवता अन् महापुरुष यांची नावे असतील, अशा विक्रेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भा.दं.वि. कलम २९५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात