रामराज्य स्थापणे आणि राममंदिराची उभारणी यांसाठी प्रभु श्रीरामाला साकडे !
मुंबई : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीरामाचा अयोध्यानगरीत जन्म झाला, हे ऐतिहासिक आणि धार्मिक सत्य आहे. असे असतांनाही गेली ४९० वर्षे राममंदिर पुनर्निर्माणाच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एकाही सत्ताधारी पक्षाने किंवा नेत्याने राममंदिराच्या उभारणीसाठी कोणतीही ठोस कृती केली नाही. जनतेसाठी न्याय्य राज्यकारभार केला, तो रामलला आज एका तंबूमध्ये विराजमान आहे. कोट्यवधी हिंदू ज्याची प्रतीक्षा करत आहेत, तो राममंदिराचा खटला आपल्या न्यायव्यवस्थेचे ‘प्राधान्य’ नाही ! त्यामुळे न्यायालयाकडूनही राममंदिराला ‘तारिख पे तारिख’ मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा ‘रामराज्याची स्थापना’ आणि ‘राममंदिराची उभारणी’ यांसाठी प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्याविना हिंदूंकडे काही पर्याय राहिलेला नाही.
याचसाठी श्रीरामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात १०० हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. या वेळी ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांत एकत्र जमून श्रीरामनामाचा सामूहिक जप आणि ‘हे प्रभु श्रीरामा, राममंदिराची उभारणी अन् देशात रामराज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी तूच कृपा कर. या प्रक्रियेमध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर कर’, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
समस्त हिंदु समाजाने राममंदिरासाठी श्रीरामाला साकडे घालावे !
यात पुढे म्हटले आहे की, वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’, यावर शिक्कामोर्तबही केले. तरीही गेली ९ वर्षे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. जगभरातील मुसलमान त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का-मदिना येथे, तर ख्रिस्ती त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जेरूसलेम येथे जातात. एकीकडे भारताचे ‘निधर्मी’ म्हणवणारे सरकार या धार्मिक यात्रांना अनुदानही देते; मात्र हिंदुबहुल भारतात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीमध्ये श्रीरामाची साधी पूजा करण्यासही बंदी घातली जाते, हे अनाकलनीय आणि हिंदूंसाठी अन्याय्य आहे. आता हिंदूंना प्रभु श्रीराम एकमेव आधारस्तंभ राहिले आहेत. यासाठी राममंदिर आणि रामराज्य यांची कामना करणार्या समस्त हिंदु समाजाने श्रीरामाला साकडे घालावे, श्रीरामाचा नित्य जप आणि प्रार्थना करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.