मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून २४८ ठिकाणी रामनवमीनिमित्त ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासमवेत विविध संप्रदाय, स्थानिक मंदिरांतील भाविक, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सहभागी होऊन श्रीरामाचा नामजप केला. ११ सहस्रांहून अधिक जण या उपक्रमात सहभागी झाले होते. ‘रामराज्याची स्थापना व्हावी आणि अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी’, या उद्देशाने विविध मंदिरांमध्ये हिंदूंनी एकत्र येऊन श्रीरामाचा सामूहिक नामजप केला. या संदर्भात न्यायालयाला पत्र लिहिण्याच्या उपक्रमालाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नामजप करणार्या भाविकांनी ‘नामजप करून आनंद मिळाला आणि यापुढेही अशा प्रकारचे अभियान राबवावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही भाविकांनी धर्मशिक्षणवर्ग किंवा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
राममंदिर उभारणी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रम
पुणे : राममंदिर उभारणीच्या कार्यात श्रीरामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप, राममंदिर स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यासाठी साकडे घालणे, रामराज्य यावे यासाठी प्रार्थना, पत्रलेखन अशा प्रकारे उपक्रम केले गेले. यामध्ये जिज्ञासू, सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, श्रीरामाचे भक्तगण यांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
१. नर्र्हे गाव येथील श्रीराम मंदिरात साकडे घालण्यात आले. या ठिकाणी वाचक, मंदिराचे प्रमुख आणि भक्तगण उपस्थित होते.
२. डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथील राम मंदिरात मंदिराचे पुजारी श्री. खरे, सनातनचे साधक आणि धर्मप्रेमी यांनी साकडे घातले आणि सामूहिक नामजप केला.
३. श्रीराम मंदिर, हवालदार मळा, विश्रांती वाडी येथे मंदिराच्या विश्वस्तांकडून साकडे घालण्यात आले. तसेच हिंदु राष्ट्राचा उद्देश आणि निर्धार सांगून श्रीमाचा जप करण्यात आला.
४. राजगुरूनगर येथील विठ्ठल मंदिर, श्री राममंदिर, जुन्नर येथील मंदिर, दौलत राममंदिर, मुकुंदनगर, सातारा रस्ता या ठिकाणी साकडे घालण्यात आले.
५. श्री महालक्ष्मी मंदिर, सिंहगड रस्ता या ठिकाणी राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ, वडगाव बुद्रुक यांनी महालक्ष्मीदेवीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त साकडे घातले.
६. पिंपळे गुरव येथील मारुति मंदिरात धर्माभिमान्यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक नामजप करण्यात आला
७. तळेगाव येथील श्री राममंदिरात श्रीरामनामाचा गजर आणि सामूहिक नामजप करण्यात आला. विश्वस्तांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमात पालट करून सामूहिक जप केला. तसेच साकडे घालण्यात आले.
८. पिंपरी गावातील मारुति मंदिरामध्ये सामूहिक नामजप घेण्यात आला आणि ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयाची माहिती देण्यात आली. ३० जिज्ञासू सहभागी झाले होते.
९. याचप्रमाणे वल्लभनगर येथील दत्त मंदिर, मारुति मंदिर, श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीरामनामाच्या जपाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० हून अधिक जिज्ञासू सहभागी झाले होते.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकूण ३४ ठिकाणी सामूहिक नामजप अभियान राबवण्यात आले.
माहीम येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त साकडे !
माहीम : श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी माहीमच्या कापड बाजार येथील श्रीराम मंदिरात अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी देवाला साकडे घालण्यात आले, तसेच या संदर्भात जागृतीसाठी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. अनिल नाईक यांनी पूजन करून नारळ वाढवला. येथील पुजारी श्री. अनिल पराडकर यांनी संकल्प वाचन केले आणि सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांनी साकडे घालण्याचा उद्देश स्पष्ट करून साकडे घातले.
या वेळी ६० हून अधिक भाविक उपस्थित होते. २८ भाविकांनी पत्र अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सहकार्याविषयी राममंदिर विश्वस्त मंडळ आणि तेथील पुजारी यांचे आभार मानण्यात आले.