हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना निवेदन
मुंबई : श्री माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुफेजवळ प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी आरती करण्यात येते. या आरतीमध्ये देशभरातील अनेक भक्त सहभागी होतात. आरतीमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक भक्तांकडून ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ आतापर्यंत प्रत्येकी १ सहस्र रुपये आकारत होते. हेच दर येथून पुढे आरतीमध्ये सहभागी होणार्या प्रत्येकासाठी २ सहस्र रुपये असणार आहेत, अशी घोषणा ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डा’ने नुकतीच केली आहे. श्री माता वैष्णोदेवीला लक्षावधी भाविक येत असतात. तेथे येणार्या भाविकांना सोयीसुविधा देणे तर लांब; मात्र प्रत्येक वेळी शासन बहुसंख्येने येणार्या हिंदूंवरच अधिभार लावते, असे आतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर मर्यादा आणण्याचा प्रकार आहे आणि तो अत्यंत संतापजनक आहे. ही दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाकडे वैष्णोदेवीच्या भक्तांनी अर्पण केलेला निधी कोट्यवधी रुपयांमध्ये जमा आहे. असे असतांना बोर्ड हिंदूंकडून अशा प्रकारे पैसा गोळा करून एक प्रकारे हिंदु भाविकांचे पाकिट मारण्याचा घृणास्पद प्रकार करत आहे. नुकताच प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे कुंभमेळा संपन्न झाला. कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय घेतला होता; पण हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे ही दरवाढ मागे घेण्यात आली. या अनुषंगाने समस्त देवीभक्त आणि हिंदु धर्माभिमानी यांची मागणी आहे की, अशा प्रकारे अन्य बाबींमध्ये आर्थिक लूटमार होत असल्यास त्याची सखोल चौकशी करून ती तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत.