हिंदूंना जागृत करणे म्हणजे साधनेद्वारे त्यांच्यातील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणे होय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
बुटवल (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही सदस्य यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी राजकारण्यांवर दबाव निर्माण करण्याचे कार्य करावे लागेल. सध्याचे राजकारणी ‘हिंदु राष्ट्र’ आणू शकणार नाहीत; कारण ते कोणत्याही सिद्धांतानुसार चालत नाहीत. माकडउड्या मारल्यासारखे ते पक्षच नाही, तर सिद्धांतही पालटतात. धार्मिक संघटनांचीही अशीच स्थिती असल्यामुळे लोकांचा संघटना आणि साधू-संत यांच्यावरही विश्वास राहिला नाही. कोण काय करत नाही, याची चर्चा करण्यापेक्षा मी काय करतो याकडे लक्ष दिले आणि कार्य केले, तर हिंदु राष्ट्र नक्की येईल. आज हिंदूंना जागृत करणे म्हणजे साधनेद्वारे त्यांच्यातील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणे होय; कारण श्रीकृष्णाने ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, असे सांगितले आहे. संघटनात शक्ती असते; पण हे संघटन धर्माचरण आणि साधना करणार्यांचे असले पाहिजे.’’
अनासक्त झाल्यावर खरा संन्यास प्राप्त होतो ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
पोखरा (नेपाळ) : सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ६.४.२०१९ या दिवशी पोखरा, नेपाळ येथे स्वामी बोधानंद यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळीका सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना सनातन आश्रमात ‘सनातन वैदिक धर्मातील साधना आणि प्रथा यांचा मनुष्यावर होत असलेला परिणाम’ याची विविध वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून करत असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘हिंदूंनी कर्मकांड सोडले आहे. वर्णाश्रमव्यवस्था मानत नाहीत, तरीही स्वतःला ‘हिंदु’ म्हणवतात. ईश्वरप्राप्तीसाठी केवळ ध्यान नाही, तर ज्ञानही पाहिजे. अनासक्त झाल्यावर खरा संन्यास प्राप्त होतो.’’
येणार्या भीषण आपत्काळात रक्षण होण्यासाठी सर्वांनी साधना करून तपोबल वाढवण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
७.४.२०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी पोखरा, नेपाळ येथील श्री विन्द्यवासिनी मंदिराचे महंत श्री नि:षेशानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी महंतांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे आणि सोबत असलेले साधक यांची आपुलकीने चौकशी केली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’विषयी सविस्तर जाणून घेतले. समितीच्या कार्याविषयी कौतुक करतांना महंत म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी मीच लोकांना एकत्रित करीन आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आमचा येथे आश्रम आहे. या आश्रमात तुम्ही केव्हाही या. तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी आमच्या आश्रमाचा वापर करू शकता. या वेळी त्यांनी स्वतःहून नेपाळी केबल वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करण्यासाठी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा संदेश ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) करून घेतला.
युवकांना धर्माचरण शिकवल्यास ते धर्मकार्यात सहभागी होतील ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
पोखरा (नेपाळ) : विश्व हिंदु महासंघ, जिल्हा कार्य समिती, कास्की आणि केदारेश्वर महादेव मणी सेवा आश्रम यांच्यावतीने ‘नेपाळी नववर्ष २०७६ च्या पंचांग प्रकाशना’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘आज हिंदूंनी धर्म काय आहे ? पंथ काय आहे ? संप्रदाय काय आहे ? धर्मनिरपेक्षतेची संकल्पना काय आहे ? सर्वधर्मसमभाव कुठे असतो का ? सर्व उपासना पद्धतींना आपण धर्म म्हणू शकतो का ? आदींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज युवकांना ‘प्रत्येक धार्मिक कृतीचे जीवनातील महत्त्व आणि त्यामागील शास्त्र, तसेच धर्मामध्ये सांगितलेल्या गोष्टी जीवनात कशा आचरणात आणायच्या ?’ हे सांगण्याची आवश्यकता आहे, तरच ते आपल्यासोबत धर्मकार्यात सहभागी होतील अन्यथा पाश्चात्त्य संस्कृतीकडे खेचले जातील.’’ या कार्यक्रमात केदारेश्वर महादेव मंदिराचे महंत डॉ. लेकराज आचार्य महाराज, नेपाळचे खासदार श्री. सूर्य बहादूर केसी, तसेच सनातन हिंदु धर्म परिषद, नेपाळ ब्राह्मण सभा, कालबाह्य मंदिर संरक्षण समिती आणि विश्व हिंदु महासंघ यांचे सदस्य उपस्थित होते.
‘नेपाळ आणि भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनण्यासाठी चिनवन येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सामूहिक प्रार्थना
चिनवन (नेपाळ) : ६.४.२०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी नारायणघाट, चिनवन (नेपाळ) येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’चे सदस्य श्री. रामचंद्र पिया, श्री. प्रकाश ढकाल आणि त्यांचे कुटुंबीय यांची चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर भेट घेतली अन् ‘नेपाळ आणि भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनण्यातील अडथळे दूर होऊ देत’, अशी सामूहिक प्रार्थना केली.