वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याच्या आरोपांतर्गत न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मुफिद एलफजीह या ३२ वर्षीय दोषीस तब्बल २२.५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. एलफजीह हा न्यूयॉर्कमधील रॉंचेस्टर येथील पिझ्झा दुकानदार आहे.
इसिसशी संबंधित कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांतर्गत २०१३ पासून अमेरिकेमध्ये ८० जणांना शिक्षा सुनाविण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात इसिसमध्ये एलफजीह याच्यावर दोन दहशतवाद्यांची भरती करण्यासंदर्भातील आरोप सिद्ध झाला होता; याशिवाय अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांस ठार मारण्याच्या प्रयत्नाबरोबरच बेकायदेशीर शस्त्रसाठा केल्यासंदर्भातील आरोपही त्याच्याविरोधात निश्चित करण्यात आले होते.
अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबरच न्यूयॉर्कमधील शिया मुसलमानांनाही ठार करण्याची इच्छा असल्याचे एलफजीह याने म्हटले होते. इसिसच्या वाढत्या वैचारिक प्रभावामुळे अमेरिकेसहित एकंदरच पाश्चिमात्य देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
स्त्रोत : सकाळ