येणार्या भीषण आपत्काळात रक्षण होण्यासाठी सर्वांनी साधना करून तपोबल वाढवण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
काठमांडू (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्यात ८.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील दैनिक ‘नया पत्रिका’चे पत्रकार श्री. परशुराम काफले, विराटनगर जूट मिलचे अध्यक्ष आणि नेपाळ सरकारच्या आय.टी. समितीचे सदस्य श्री. बसंतजी यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांच्याशी चर्चा करतांना सांगितले, ‘‘ईश्वरी संकेतानुसार पुढे येणार्या भीषण आपत्काळासाठी सर्वांनी साधना करून तपोबल वाढवण्याची आवश्यकता आहे.’’
वृत्तपत्रातून जागृती करून शंकराचार्यांचे पाचवे पीठ स्थापन करण्याचे षड्यंत्र असफल करणारे पत्रकार श्री. परशुराम काफले !
काठमांडू येथे नव्याने पशुपतीपीठाचे शंकराचार्य घोषित करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वेळी ‘अशी घोषणा करणे, हे धर्मविरोधी आहे. केवळ आद्यशंकराचार्यांनी स्थापन केलेली चार पीठे आणि त्यांनी त्याविषयी जे नियम लिहून ठेवले आहेत, तेच मान्य आहेत’, याविषयी श्री. परशुराम काफले यांनी वृत्तपत्रात लेखन करून जागृती केली. त्यामुळे नव्याने शंकराचार्यांचे पाचवे पीठ स्थापन करण्याचे हे षड्यंत्र असफल झाले. लेखन करून जागृती करण्याची ही सेवा करवून घेतल्याविषयी त्यांनी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली. श्री. परशुराम काफले यांनी केलेल्या या संघर्षाविषयी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते.
या वेळी श्री. बसंतजी यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना विराटनगरमध्ये येण्याची विनंती केली आणि गोवा येथील सनातन आश्रमाला भेट देण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
काठमांडू येथील त्रिचंद्र विश्वविद्यालयाचे प्राध्यापक श्री. गोविंद शरण उपाध्याय यांच्याशी भारतातील सात्त्विक समाजव्यवस्थेविषयी चर्चा
काठमांडू येथील त्रिचंद्र विश्वविद्यालयाचे प्राध्यापक श्री. गोविंद शरण उपाध्याय यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ९.४.२०१९ या दिवशी भेट घेतली. या वेळी प्राध्यापक श्री. उपाध्याय यांनी ते सध्या अमेरिकी आणि भारतवर्ष (नेपाळ आणि भारत) येथील समाजव्यवस्थेचा अभ्यास करत असल्याचे सांगितले. याविषयी सांगतांना ते म्हणाल, ‘‘अमेरिकी समाजात घटस्फोटाचे प्रमाण ५२ टक्के आहे आणि या तुलनेत भारत-नेपाळ येथे हे प्रमाण केवळ १.५ टक्के आहे. सुखी कुटुंबांमध्येही भारत पुढेच आहे.’’ यामागील कारण सांगतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना भारतातील सात्त्विक समाजरचना, स्त्रियांचा केला जाणारा आदर, मातृसत्ताक पद्धती, विवाह संस्कार आदींविषयी माहिती दिली.
काठमांडू येथील ‘नवचेतना ऑनलाइन पोर्टल’चे संपादक श्री. कर्ण प्रखर धेताल यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी श्री. धेताल म्हणाले, ‘‘नेपाळमधील राजेशाही गेली आणि त्यानंतर नेपाळचा जगातील एकमात्र असलेला हिंदु राष्ट्राचा दर्जा काढून त्याला धर्मनिरपेक्ष केले आणि त्यामुळे बहुसंख्य हिंदु समाजामध्ये निराशा पसरली. अशा वेळी हिंदु धर्म कसा जागृत हेाईल ?’’ या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘सनातन धर्माची परंपरा आहे की, जेव्हा पुनरुत्थानाचे कार्य होईल, तसेच जेव्हा समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण होईल, त्या वेळी समाज ईश्वराला संपूर्णत: शरण जाईल आणि आत्मचिंतन करील; कारण आत्मचिंतन केल्याने स्वत:तील दोष दूर होऊन पुन्हा हिंदु समाज पुन:स्थापनेच्या दिशेने गतीने जाऊ शकतो. धर्माचे कार्य करतांना विचार आणि दृष्टी महत्त्वाची असते. हिंदु समाजातील निराशा दूर होण्यासाठी आज समाजाला दिशा आणि दृष्टी देणारी, तसेच पुनरुत्थानासाठी आवश्यक असणारी आध्यात्मिक ऊर्जा संक्रमित करू शकेल, अशा क्षमतेच्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीची आवश्यकता आहे.’’
धर्मनिरपेक्ष राज्यघटनेला विरोध करून हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आग्रह धरणारे काठमांडू येथील विश्व हिंदु महासंघाच्या केंद्रीय समितीचे सदस्य श्री. शंभु हरि बस्तोला !
काठमांडू ८.४.२०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी काठमांडू येथील विश्व हिंदु महासंघाच्या केंद्रीय समितीचे सदस्य श्री. शंभु हरि बस्तोला यांची भेटी घेतली. या वेळी श्री. बस्तोला म्हणाले, ‘‘नेपाळी जनतेवर सरकारने थोपवलेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीविषयी बहुसंख्य नेपाळी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकार जनतेच्या भावनांना पायदळी तुडवत आहे. यासाठी आपण नेपाळ काँग्रेसच्या केंद्रीय बैठकीत जाऊन ‘काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणजे पापी राज्यघटनेला पाठिंबा देऊन पापाचे भागीदार होत आहे आणि यासाठी तिला जनतेला उत्तर द्यावे लागेल’, याची त्यांना जाणीव करून दिली आणि नेपाळ काँग्रेसमध्ये हिंदु राष्ट्राच्या मागणीचे बिगुल वाजवले.’’
या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘संघर्षाशिवाय हिंदु राष्ट्र येणार नाही. आज नेपाळमधील सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची, तसेच, धर्मविरोधी घटनांविषयी वैध मार्गाने आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.’’