पुणे : आज जर हेमंत करकरे असते, तर माझ्याविरोधात दोषारोपपत्र प्रविष्टच झाले नसते आणि ९ वर्षे मला कारागृहात काढावी लागली नसती. आतंकवादविरोधी पथकाचे जे अन्य अधिकारी होते ते अमानवीय आणि क्रूर होते. त्यांनी आमचा अतोनात छळ केला आणि आयुष्य उद्ध्वस्त केले. हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करा, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले श्री. समीर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात नाहक गोवण्यात आलेले आणि या खटल्यातून ‘डिस्जार्च’ झालेले श्री. राकेश धावडे, हिंदु महासभेचे श्री. संजय वैशंपायन, अधिवक्त्या नीता धावडे, समस्त हिंदु आघाडीचे श्री. गोविंद चिल्लवेरी आणि हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. सचिन पाटील उपस्थित होते.
कोणतेही अतिरेकी कृत्य केले नसतांनाही तत्कालीन राज्यकर्त्यांनी आम्हाला कारागृहात टाकून आमचा अनन्वित छळ केला. आमचा राजकीय बळी दिला. अशांना निवडून देऊ नका, असे आवाहन श्री. राकेश धावडे यांनी केले.
पत्रकार परिषदेच्या वेळी श्री. समीर कुलकर्णी यांनी मांडलेली अन्य सूत्रे
तत्कालीन आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना कळून चुकले होते की, माझा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध नाही. त्यानंतर करकरे यांनी मला सांगितले होते की, माझा या बॉम्बस्फोटाशी संबंध नसला, तरी माझ्याशी संबंधित अन्य कुणाचा संबंध आहे का, हे पहाण्यासाठी नार्को चाचणी होऊ देत. मालेगाव स्फोटप्रकरणी १० सहस्र पानांचे जे दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते, त्यामध्ये मी आक्षेपार्ह कृत्य केल्याचे किंवा त्याचे समर्थन केल्याची एकही ओळ नव्हती. (दोषारोपपत्रात आक्षेपार्ह कृत्य केल्याची एकही ओळ नसतांना हिंदु व्यक्तीचे आयुष्य कारागृहात सडवणारी व्यवस्था आणि हिंदुद्वेषी राजकारणी ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अधोरेखित करते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राकेश धावडेंविषयी संवेदना व्यक्त करण्यास शरद पवार यांना जमत नाही !
देशद्रोही इशरत जहाँ, नजरकैदेतील कोरेगाव भीमा येथे दंगल घडवणारे नक्षलवादी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्यास शरद पवार यांना वेळ आहे; मात्र ज्या राकेश धावडे यांना न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून मुक्त केले, त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करण्यास शरद पवार यांना जमत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात