पेजावर (कर्नाटक) येथील श्रीकृष्ण मठाचे श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांचे मत, कर्नाटकमध्ये हिंदूंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लादण्याचा घाट
उडुपी (कर्नाटक) : राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. इतर पंथांमध्ये पुष्कळ अंधश्रद्धा असूनही यात त्याविषयी चकार शब्दही न काढता केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य करणे , हा चिंतेचा विषय आहे. याचा आम्ही तीव्र विरोध करतो.
या कायद्यात श्रद्धा कोणत्या आणि अंधश्रद्धा कोणत्या यांचाही उल्लेख नाही; म्हणून हा कायदा लागू करणे हिंदूंच्या हिताच्या दृष्टीने विनाशकारी आहे. त्यासाठी हिंदु संघटनांनी हा कायदा येणारच नाही, यासाठी संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे, असे मत पेजावर येथील श्रीकृष्ण मठाचे श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांनी व्यक्त केले.
कर्नाटकमध्ये हिंदूंवर आघात करणारा प्रस्तावित कर्नाटक अनिष्ट, अमानवीय आणि अंधश्रद्धा आचरण प्रतिबंध तसेच निर्मूलन कायदा २०१४ हा कायदा करण्याचा घाट शासन घालत आहे. या विषयी हिंदु धर्माभिमान्यांनी श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. या वेळी सर्वश्री विश्व हिंदू परिषदेचे सुप्रसाद शेट्टी, केशव, नीलावर गो-शाळेचे कार्यदर्शी राघवेंद्र आचार्य, श्रीराम सेनेचे मोहन भट, युवभारत संघटनेचे हरीश पडुकरे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता दिनेश नायक, हिंदु जनजागृती समितीचे राम शेट्टीगार आदी धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात