गणेशोत्सवाच्या काळात हिंदुत्वनिष्ठांना शहरबंदीचा आदेश दिल्याचे प्रकरण
हिंदुत्वनिष्ठांना अकारण शहरबंदीचा आदेश काढून त्यांना नाहक त्रास देणार्या पोलिसांसह सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी का करू नये ?
नंदुरबार : उच्च न्यायालयाकडून सरकार, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांना ‘डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयूर चौधरी यांना चुकीच्या पद्धतीने शहरात येण्यापासून रोखले, यासाठी हानीभरपाई का देण्यात येऊ नये ?’ अशा आशयाची नोटीस काढण्यात आली आहे. वर्ष २०१८ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मयुर चौधरी यांना शहरबंदी करण्यात आली होती. ‘ही कारवाई आकसापोटी झाली असून यामुळे त्यांची सामाजिक हानी झाली आहे, तसेच अवमानही झाला आहे’, अशी तक्रार अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र पाटील आणि मयूर चौधरी यांचा शहरबंदीचा आदेश सत्र न्यायालयाकडून यापूर्वीच रहित केला आहे.
उच्च न्यायालयाची नोटीस पोलिसांना मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांचा छळ चालूच आहे, त्यासाठी त्यांच्यावर ‘चॅप्टर केस का करू नये ?’ अशी नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी ३ मे या दिवशी ठेवली आहे.
सत्र न्यायालयाकडून डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयूर चौधरी यांचा शहरबंदीचा आदेश रहित !
तत्पूर्वी नंदुरबार येथील जिल्हा सत्र न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मयूर चौधरी यांचा ‘गणेशोत्सवाच्या वेळी शहरात प्रवेश करू नये ?’ हा आदेश सत्र न्यायालयाने रहित केला होता. या वेळी ‘हा हुकूम बेकायदेशीर आणि आकसापोटी काढलेला आहे’, हे न्यायालयाने मान्य केले.
१. वर्ष २०१८ मध्ये गणेशोत्सवापूर्वी नंदुरबार शहरात होेणार्या शांतता समितीच्या बैठकीत ‘रात्री १२ वाजल्यानंतर श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांवर कारवाई करण्यात येईल; कारण असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे’, असे पोलिसांनी सांगितले. या वेळी डॉ. नरेंद्र पाटील यांनी, ‘अजानच्या भोंग्यांना पहाटे ६ पूर्वी अनुमती नाही, हाही उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि या आदेशाचेे पालन केले जावे’, असे सूत्र मांडले होते.
२. त्यानंतर उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी टाळ्या वाजवल्या होत्या, तसेच ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेच असे सूत्र मांडू शकतात’, अशा शब्दांत सर्वांनी त्यांचे कौतुक केले होते.
३. मात्र या घटनेनंतर तेथे उपस्थित पोलीस अधिकार्यांनी डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयूर चौधरी यांना वरील शहरबंदीचे आदेश दिले होते.
४. या प्रकरणी अधिवक्ता कुलकर्णी यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयूर चौधरी हे शहरातील प्रतिष्ठित हिंदुत्वनिष्ठ आहेत. डॉ. नरेंद्र पाटील यांनी नियमानुसार योग्य सूत्र मांडले होते, तरी शहरबंदीच्या निर्णयामुळे त्यांचा अपमान होत आहे.’’ वरील सूत्र ग्राह्य धरून न्यायालयाने डॉ. पाटील यांचा शहरातील प्रवेशबंदीचा आदेश रहित केला.