नवी मुंबई : येथील सेक्टर १०, नेरूळ येथे विविध संघटनांच्या शिवशंभूप्रेमींनी एकत्र येत चैत्र शुद्ध पौर्णिमा या तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी शिववंदनाही घेण्यात आली. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी एकूण ७० जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडतांना श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी श्री. गणेश बर्गे म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म टिकण्यासाठी महाराजांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळेच आज आपण ‘हिंदू’ म्हणून जिवंत आहोत. कवी भूषण यांनी केलेले वर्णन वाचल्यास आपल्याला महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समजेल आणि आपणही आज जे कार्य करायचे, ते तळमळीने करू शकू. देव, देश आणि धर्म यांसाठी कसे लढायचे याची शिकवण महाराजांनीच आपल्याला दिलेली आहे.’’ श्री. गणेश बर्गे यांनी या वेळी गडकोट मोहिमेचे महत्त्व विशद केले.
राममंदिराच्या उभारणीसाठी शिवशंभूप्रेमींचे साकडे आणि सामूहिक नामजप !
या कार्यक्रमात शिवशंभूप्रेमींनी अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी साकडे घालून सामूहिक नामजप आणि प्रार्थना केली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवि पाटील यांनी साकडे घालण्याचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे महाराजांनी देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य केले, त्याप्रमाणे आज आपण राष्ट्र-धर्म रक्षणासाठी कार्य करण्याची आवश्यकता असून त्यासाठी अयोध्येत राममंदिर होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’