हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू : ‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने मेगा विद्यालयामध्ये ‘चिंतन चौतारी’ हा नव्याने उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. १३.४.२०१९ या दिवशी या उपक्रमाचा आरंभ हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. ‘टिम नेपो’चे अध्यक्ष निगम पौडेल यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळेे यांचे स्वागत केले. या वेळी आयुर्वेदिक शाखेसह अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘युथ, हेल्थ अॅण्ड लाईफस्टाईल’ या विषयावर मार्गदर्शन ठेवले होते. या विषयावर मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘मनातील संस्कारांना मिळणार्या अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना म्हणजे सुख-दु:ख आहे. जीवनाचे नेमके ध्येय सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंदाची अवस्था प्राप्त करणे म्हणजे अनुकूल प्रसंगांताही अतीउत्साही न होणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःवर कोणताही परिणाम होऊ न देेता स्थिर रहाणे होय. ज्याची दृष्टी चांगली असेल, त्याला जग चांगले दिसते आणि ज्याची दृष्टी वाईट असते, त्याला जग वाईट दिसते. चित्त शुद्ध झाले, तर दृष्टी शुद्ध होते आणि यासाठी साधना करणे आवश्यक आहे.’’
या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेतले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ‘एकाग्रता कशी साध्य करावी ? नकारात्मक प्रसंगात स्थिर कसे रहावे ? व्यक्तीमत्त्व विकास कसा करावा ?’ इत्यादी प्रश्नांची उत्तरे देतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगितले.