- धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम !
- हिंदूंनो, या यशासाठी श्रीकृष्णचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
हडपसर (पुणे) : लोकांनी जिन्यांमध्ये थुंकू नये, यासाठी जिन्यांच्या कोपर्यात देवतांची चित्रे असलेल्या फरशा (टाईल्स) बसवण्याची कुप्रथा पडली आहे. येथील प्रसिद्ध नोबेल रुग्णालयामध्येही अशा प्रकारे जिन्यांच्या कोपर्यांमध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्या फरशा बसवण्यात आल्या होत्या. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली धर्माभिमान्यांनी नोबेल रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले आणि देवतांचा होणारा अनादर रोखण्यासाठी या फरशा काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालय प्रशासनाने त्वरित कृती करत देवतांच्या फरशा काढून टाकल्या. (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून कळत-नकळत देवतांचा अनादर होतो आणि देवाप्रतीचा भावही बोथट होतो. हिंदूंनी दिलेल्या निवेदनाची नोंद घेत त्वरित कृती करणार्या रुग्णालय प्रशासनाचा आदर्श इतरांनीही घ्यावा ! देवतांचा होणारा अनादर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे ! – संपादक)
निवेदन देतांना अधिवक्ता लक्ष्मण घुले, अधिवक्ता श्रीकांत बनसोडे, धर्माभिमानी श्री. हनुमंत जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. ऋषिकेश उबाळे, श्री. समर्थ ताठे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. भाग्येश्वर रोडगे, सौ. अनघा सादिगले आणि श्री. शशांक सोनवणे उपस्थित होते. हडपसरमध्ये सर्वत्रच अशा प्रकारे मोहीम राबवून जिन्यामधील देवतांच्या फरशा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार धर्माभिमान्यांनी व्यक्त केला.