हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू (नेपाळ) : धर्माचे शुद्ध स्वरूप जाणून घ्या. हिंदूंकडे संख्याबळ आणि बाहूबळ दोन्ही आहे; मात्र कार्य हे आत्मबळ आणि धर्मबळ यांच्या आधारावर होते. त्यामुळे सर्वांनी साधना करून आत्मबळ आणि धर्मबळ जागृत करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळी जनतेला केले.
‘फरक संदेश डॉट कॉम’ या यू ट्यूब वृत्तवाहिनीचे सचिव श्री. महेंद्र पोखरेल यांनी १२ एप्रिल २०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी श्री. पोखरेल यांनी नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यात आल्याविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘नेपाळ आणि भारत जरी भिन्न देश असले, तरी त्यांची संस्कृती अन् धर्म एक आहे. नेपाळी जनता धर्मपरायण आहे, धर्मावर प्रेम करणारी आहे. ‘नेपाळमध्ये धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था असावी’, असे नेपाळी जनतेला वाटते. जेथे धर्म नसेल, तेथे अधर्म असेल. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे अधर्मसापेक्ष राष्ट्र होय.’’
भारतात होणार्या धर्मांतराविषयी बोलतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘हिंदू सर्वधर्मसमभाव मानतात; पण अन्य पंथियांचे काय ? ते सर्वधर्मसमभाव मानतात का ? समभाव आहे, तर ते धर्मांतर का करतात ? जिहाद का करतात ? भारतीय राज्यघटनेत धर्मांतराला प्रतिबंध आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ४८ नुसार व्यक्तीगत जीवनात धर्माचरणाची आणि समाजाला धर्माविषयी सांगण्याची अनुमती देण्यात आली. ‘राईट टू प्रपोगेट रिलिजन’ (धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार) म्हणजे ‘राईट टू कन्व्हर्ट’ (धर्मांतर करण्याचा अधिकार) नव्हे.’’
जनतेला जागृत न करता केलेले आंदोलन अयशस्वी होते ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
काठमांडू (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी १४ एप्रिल २०१९ या दिवशी ‘सनातन धर्म संरक्षण अभियान’चे केंद्रीय समन्वयक श्री. राजेंद्र ओझा यांची भेट घेतली. या वेळी ‘हिंदु राष्ट्रासाठी आंदोलनाची दिशा कशी असावी ?’ याविषयी मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘जनता अवलंबून असते. ती स्वत: निर्णय घेण्याच्या स्थितीत नसते. त्यामुळे जनतेला जागृत करण्याची आवश्यकता आहे. जनतेला जागृत न करता केलेले आंदोलन अयशस्वी होते. ख्रिस्ती आणि मुसलमान संघटितपणे आपल्या मागण्या सरकारकडे मांडतात. सत्ताधारी सत्ता देणार्यांचे लागूलचालन करतात. जर हिंदू जागृत झाले, तर काँग्रेसच नाही, तर कम्युनिस्टही हिंदूंंच्या मागे येतील. जोपर्यंत जनता जागृत होत नाही आणि स्वत:च्या अधिकारासाठी संघर्ष करत नाही, तोपर्यंत सर्व प्रयत्न अयशस्वी होतात.’’
‘नेपाळ सनातन धर्म संस्कृती’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
काठमांडू (नेपाळ) : ‘जय संगत’चे संस्थापक आणि राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे सचिव श्री. पुष्पराज पुरुष यांनी ‘नेपाळ सनातन धर्म संस्कृती’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले…
- ‘ज्याने व्यक्तीची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते, तसेच समाजव्यवस्था उत्तम रहाते तो म्हणजे धर्म’, अशी आद्यशंकराचार्यांनी धर्माची व्याख्या केली आहे. आद्यशंकराचार्यांनी केलेल्या व्याख्येनुसार पाहिले, तर धर्मनिरपेक्ष राष्ट्राची अपेक्षा करणार्यांना व्यक्तीची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती, तसेच उत्तम समाजव्यवस्था नको आहे, असे वाटते.
- अत्यंत त्यागी वृत्तीनेच धर्माचे कार्य होऊ शकते. पदाची लालसा हा संघटन होण्यामध्ये अडथळा आहे. निरपेक्षता, निःस्वार्थी आणि निष्पक्ष लोकच संघटन करू शकतात.
- निद्रिस्त जनता ही राजकारण्यांची शक्ती आहे, तर जागृत जनता ही लोकशाहीची शक्ती आहे.
- भारताची राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: धर्मनिरपेक्षतेचा विरोध केला होता, याची नोंद आहे.
- ज्यांच्याकडे ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आहेत, ते आज आम्हाला समानता, स्पृश्य-अस्पृश्यता शिकवायला निघालेत.
- ज्यांनी ३० लाख रेड इंडियनांची कत्तल करून अमेरिका वसवली, ते आम्हाला मानवता शिकवायला निघाले आहेत.
- आज आपल्या अज्ञानामुळे विकृत जातीवाद वाढत आहे. सनातन धर्मात जातीचा संघर्ष केव्हाच नव्हता, केवळ धर्म-अधर्माचा संघर्ष होता.
- तुम्हाला माहीत असणार्या कोणत्याही १० ऋषींचे नावे घ्या आणि त्यापैकी किती ब्राह्मण आहेत ते पहा. जातीयवाद केवळ हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी निर्माण करण्यात आला.
क्षणचित्र : ‘सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्यातील प्रेमभावामुळे ते नेपाळमधीलच असल्यासारखे वाटते’, असे उपस्थितांपैकी एकाने सागितले.
संपूर्ण विश्वाला वाचवण्याची क्षमता केवळ सनातन धर्मात आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
काठमांडू (नेपाळ) : राजकीय पक्षाला जोडून हिंदु राष्ट्राची कल्पना केली जाते. असे न करता ती सनातन धर्माला जोडून केली पाहिजे. राज्य सनातन धर्म परंपरेनुसार असले पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रक्रिया ३ पिढ्यांची आहे. सनातन धर्म सर्व प्राणीमात्रांसाठी आहे. संपूर्ण विश्वाला वाचवण्याची क्षमता केवळ सनातन धर्मात आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
नेपाळमधील एकमेव हिंदी मासिक ‘हिमालिनी’च्या डॉ. श्वेता दिप्ती यांनी १४ एप्रिल २०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी हिंदु धर्माच्या र्हासामागील कारण सांगतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘ख्रिश्चानिटीचा उदय झाल्यावर अवघ्या ५० वर्षांत पूर्ण युरोप ख्रिस्ती झाला. इस्लामचा उदय झाल्यावर अवघ्या ३० ते ५० वर्षांत संपूर्ण अरब इस्लाममय झाले. अनुमाने १२०० वर्षे सातत्याने आघात झेलूनही हिंदु धर्म टिकून राहिला; मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर धर्माकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्ञान, परंपरा पुढच्या पिढीला देण्याची जी प्रक्रिया होणे आवश्यक होते, त्यात आपण न्यून पडलो. आपण इतरांकडून नाही, तर आपल्यांकडूनच हरत आहोत. स्वधर्माला सोडूनच आपण पश्चिमात्य होत चाललो आहोत.’’
‘हिंदु राष्ट्रात राजेशाही कि लोकशाही ?’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘धर्मपरंपरेनुसार राजेशाही आणि वर्तमान परंपरेनुसार लोकशाही आहे; पण प्रत्यक्षात आज लोकशाही नाहीच आहे. आपल्यावर जी लोकशाही थोपवली गेली आहे, ती इंग्लंडच्या प्रोटेस्टंट ख्रिस्तीला संरक्षित करते. केवळ प्रोटेस्टंट ख्रिस्तीच तेथे पंतप्रधान किंवा राजपरिवाराशी जोडले जाऊ शकतात. जर्मन, फ्रान्स ही कॅथॉलिक राष्ट्रे आहेत. अरब देश इस्लामला संरक्षित करतात. युरोपच्या बहुतांश देशात राजेशाही आहे आणि लोकशाहीही आहे. आपल्याला सनातन हिंदु धर्म, परंपरा, वेद, पुराण, येथील धार्मिक आणि पौराणिक इतिहास यांना संरक्षित करणारी व्यवस्था अपेक्षित आहे. शासक धर्मनिष्ठ आणि प्रजेचे पुत्रवत पालन करणारा असावा. बाकी आपली परंपरा राजाशी जोडलेली आहे. जर एखादी नवीन राज्यव्यवस्था निर्माण होत असेल, ज्यात राजनिष्ठ व्यक्ती पंतप्रधान होत असेल आणि ती जनता, धर्म, संस्कृती अन् राष्ट्र यांचा सांभाळ करत असेल, तर तेही शक्य आहे. हे नेपाळच्या जनतेने ठरवायचे आहे कि त्यांना कोणती व्यवस्था हवी आहे.’’
क्षणचित्र : ‘हिमालिनी’ मासिकाचे संपादक श्री. सच्चिदानंद मिश्रा यांनी त्यांचे मासिक आणि पोर्टल यांवर प्रसिद्ध करण्यासाठी हिंदी अन् इंग्रजी भाषांमधील धार्मिक माहिती उपलब्ध करून देण्याविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना सांगितले.