हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
बुटवल (नेपाळ) : येथील विश्व हिंदु महासंघाचे श्री. लोकनाथ पांडे यांनी १६ एप्रिल या दिवशी एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आज लोकशाहीच्या नावावर ठगशाही चालू आहे. निवडणुकांच्या वेळी राज्यकर्ते त्यांच्या घोषणापत्रात अनेक गोष्टी पूर्ण करण्याची आश्वासने देतात; पण निवडून आल्यावर प्रत्यक्षात काहीच करत नाहीत, केवळ मनमानी करतात. ही लोकांची निव्वळ फसवणूक आहे. आज आपण स्वतंत्र कुठे आहोत ? केवळ सरकारच नाही, तर न्याययंत्रणा, शिक्षणव्यवस्था, उद्योगव्यवस्था, कृषिव्यवस्था इत्यादी काहीच आपल्या सनातन वैदिक परंपरेनुसार नाही. हिंदु राष्ट्र अभियान म्हणजे खरे स्वातंत्र्याचे आंदोलन आहे, हे लक्षात ठेवले पाहीजे. सनातन धर्माची शक्ती उपासनेत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा लढा, म्हणजे धर्म-अधर्माचा लढा आहे. राजकारणी सत्तेसाठी धर्म सोडणारे असतात; परंतु जेव्हा धर्मासाठी सत्ता सोडणारे नेतृत्व निर्माण होईल, तेव्हा हिंदु राष्ट्राचा मार्ग सुकर होईल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मार्गातील समस्यांचे केवळ चिंतन न करता उपायांचे चिंतन केले पाहीजे आणि मी काय करू शकतो, आम्ही काय करू शकतो, हे ठरवून उपायांच्या दिशेने गेले पाहिजे.’’ या वेळी विश्व हिंदु महासंघाच्या रुपन्देही जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. महेश प्रसाद श्रेष्ठ, ॐ परिवार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बुद्धी प्रसाद शर्मा, वैदिक धर्म परिषद रुपन्देही जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. तिलक प्रसाद न्योपाने आदी उपस्थित होते.