-
बुरख्यासमवेत घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी केल्याचे प्रकरण
-
महाराष्ट्र करणी सेनेची जावेद अख्तर यांना चेतावणी
करणी सेनेच्या मागणीविषयी राज्य सरकारला काय म्हणायचे आहे ?
मुंबई : गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यासमवेत घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी ‘३ दिवसांत क्षमा मागा अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू’, अशी चेतावणी दिली आहे.
१. करणी सेनेने या संदर्भात सामाजिक प्रसारमाध्यमांवरून पाठवलेल्या ‘व्हिडिओ’त म्हटले आहे की,आपल्या मर्यादांना ओळखा. राजस्थानच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी ३ दिवसांत क्षमा मागावी अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरे जावे.
२. जावेद अख्तर यांनी २ मे या दिवशी बुरखाबंदीवर आपली भूमिका स्पष्ट करतांना ‘बुरख्यावर बंदी घालण्यासमवेत राजस्थानमधील घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे’, असे म्हटले होते. (श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तेथे सुरक्षेच्या कारणावरून बुरख्यावर बंदी घातल्यानंतर तशीच मागणी देशात होऊ लागली आहे. यात अयोग्य काहीही नसतांना जावेद अख्तर यांनी घुंगटप्रथेवर बंदीची मागणी करून हिंदुद्वेषच प्रकट केला आहे. त्यांनी हिंदु समाज, प्रथा यांचा अवमान केला आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी क्षमा मागितलीच पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
३. ‘मुसलमान महिलांनी बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून केंद्र सरकारने राजस्थानात ६ मे या दिवशी होणार्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी’, असे जावेद अख्तर यांचे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते; मात्र ‘आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे’, असे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी बुरखा आणि घुंगट या दोन्हींवर बंदी घालण्याचे मत व्यक्त केले होते. (आधी चुकीचे वक्तव्य करायचे आणि नंतर सारवासारव करायची, हे जावेद अख्तर यांच्यासारख्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे नित्याचेच झाले आहे. बुरखा आणि घुंगट यांचा काडीमात्र संबंध नसतांना चुकीचे वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात