केपे : गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीचे शिर आणि हात तोडण्याचा, तसेच घुमटीच्या वरच्या भागाच्या भंजनाचा निषेधार्ह प्रकार १७ मार्चच्या रात्री घडला. १८ मार्चला सकाळी ग्रामस्थ घुमटीच्या ठिकाणी पूजनासाठी आले असता, हे भंजन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात गुढी येथील रहिवासी श्री. आनंद गावकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी श्वानपथकासह येऊन घटनास्थळी चौकशी केली आणि मूर्तीभंजनाची तक्रार नोंद करून पंचनामा केला. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यासाठी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५ आणि ४२७ खाली गुन्हा नोंद केला. यापूर्वी रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या घुमटीच्या शेजारील अर्पणपेटीतील पैसे चोरण्याचे प्रकार एक-दोन वेळा घडले होते; मात्र यासंदर्भात तक्रार न झाल्यामुळे या प्रकाराचा गाजावाजा झाला नाही. घुमटी आणि देवतेची मूर्ती यांवर आघात करणार्या समाजकंटकाला त्वरित पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पारोडा छोट्या चॅपलच्या ठिकाणी काचा फोडण्याचा आणि मूर्ती तोडण्याचा प्रकार
गुढी येथील मंदिराचे भंजन झाल्याच्या त्या ठिकाणाहून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पारोडा येथे छोट्या चॅपलवजा क्रॉसच्या ठिकाणच्या काचा फोडण्याचे आणि वेलंकिणीच्या मूर्ती फोडण्याचा प्रकार घडला आहे.
मूर्तीभंजन हे बिलिव्हर्सवाल्यांचे कारस्थान ! – पंच दिलीप गावकर
हे बिलिव्हर्सवाल्यांचे कारस्थान आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक पंच दिलीप गावकर आणि अन्य धर्माभिमानी नागरिक यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे खासदार छत्तीसगढच्या चर्चवर झालेल्या आघाताविषयी राज्यसभेत आवाज उठवतात; मात्र गोव्यातच मूर्तीभंजन आणि मंदिरातील चोर्यांच्या शेकडो घटना घडूनही कोणीही लोकप्रतिनिधी त्याविषयी आवाज उठवत नाहीत ! हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी आता सज्ज व्हा !
हे छायाचित्र छापण्यामागे कोणाच्याही धर्मभावना दुखावण्याचा उद्देश नसून धर्महानी झाल्याचे लक्षात येण्यासाठी हे छायाचित्र दिले आहे. – संपादक, हिंदुजागृती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात