अचलपूर (अमरावती) : येथील ‘शिव उत्सव समिती’कडून प्रतिवर्षी परंपरागत ‘शिव उत्सव सोहळा’ आयोजित केला जातो. यावर्षी ४ मे या दिवशी झालेल्या या उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांना निमंत्रण देण्यात आले होते. उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. विनय चतुर यांनी हे आयोजन केले. या वेळी श्री. नीलेश टवलारे यांनी ‘शिवरायांची ईश्वरभक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांना गर्भात असल्यापासूनच ईश्वरभक्तीचे बाळकडू मिळाले. ज्याप्रमाणे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना प्रत्येक कृतीला ईश्वरभक्तीची जोड दिली, वेळोवेळी गुरूंचे आणि संतांचे मार्गदर्शन घेतले, त्याचप्रमाणे आपणही आता ईश्वरभक्त बनून पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घ्यायला हवी.’’
या वेळी ह.भ.प. वसंतराव धाकतोड, अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनिताताई फिसके, संत गाडगेबाबा तक्रार निवारण समितीचे संस्थापक प्रा. श्री. प्रमोद नैकीले, आर्य समाजाचे कोषाध्यक्ष श्री. तुलसीदास सवैय्या, सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदकिशोर काळे यांच्यासह ६० धर्मप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
विशेष
- नगराध्यक्षा सौ. सुनिताताई फिसके यांनी ‘यापुढे तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही कृती करू’, अशी प्रतिक्रिया दिली.
- ‘धर्मकार्याला ईश्वरभक्तीविना पर्याय नाही. श्री. नीलेश टवलारे यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाने आम्हाला पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली’, असे ह.भ.प. वसंतराव धाकतोड यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात