नागठाणे (जिल्हा सातारा) : सध्या शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. लक्षावधी रुपयांचे कर्ज काढायचे, ते फेडण्यासाठी सामान्य जनतेकडून कररूपाने हप्ते गोळा करायचे, हे कमी म्हणून नवनवीन योजना अस्तित्वात आणायच्या आणि त्यामध्ये यथेच्छ भ्रष्टाचार करायचा, हे आपण किती दिवस सहन करणार ? युवकांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर करून चाललेला भ्रष्टाचार बाहेर काढावा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.
नागठाणे (जिल्हा सातारा) येथील श्रीचौंडेश्वरी माता मंदिराच्या आवारात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवजयंती सोहळ्याच्या समारोपानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आणि प्रेरणामंत्र म्हणून सभेचा प्रारंभ झाला. नागठाणे दिडींचे विणेकरी श्री. दिनकर साळुंखे यांच्या हस्ते अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले. सभेसाठी नागठाणे आणि पंचक्रोशीतील १५० अधिक युवक उपस्थित होते.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘माहिती अधिकार कायदा हे शस्त्र असून त्याचा वापर प्रत्येक सूज्ञ नागरिकाने राष्ट्ररक्षणासाठी केला पाहिजे. ‘मी एकटा काय करणार’, असे म्हणून हताश न होता कायद्याचे ज्ञान करून घेऊन माहिती अधिकार कायदा वापता आला पाहिजे. भ्रष्टाचारी कर्मचार्यांना वठणीवर आणून देशात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ब्रिगेडी लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना हिंदूंचा सत्य इतिहास मान्य करण्यास भाग पाडले पाहिजे. साखर कारखाना, शिक्षण संस्था, शासकीय दूध डेअरी, महामंडळे आदींच्या माधमातून जनतेला लुटले जाते. या लुटीविषयी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून संबंधितांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.’’
क्षणचित्रे
- सभास्थळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, देवतांच्या नामपट्टया, प्रतिमा आदींचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
- सभास्थळी बोरगाव पोलीस ठाण्यातील १ साहाय्यक पोलीस निरीक्षक, १ बीट अंमलदार, ३ पोलीस, २ गोपनीय विभागाचे पोलीस आणि १ पोलीस गाडी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
- ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ हे श्री. विक्रम भावे लिखित पुस्तक ग्रंथप्रदर्शनावर विक्रीसाठी सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या पुस्तकाच्या खरेदीला युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
- सभेनंतर भेटण्यासाठी आलेल्या युवकांनी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना माहिती अधिकार कार्यशाळा घेण्याची विनंती केली.
धर्मांधांना नव्हे, तर प्रत्येक वेळी केवळ राष्ट्रप्रेमींना नोटीस बजावणारे पोलीस दुटप्पीच !
सभेसाठी झटणार्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभेच्या दोन दिवस अगोदर १४९ ची नोटीस दिली होती. तसेच सभेसाठी धारकर्यांवर पोलीस सातत्याने दबाव आणत होते. सभेच्या दिवशी वक्त्यांना भेटून पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात