Menu Close

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

‘अन्य धर्मियांना फायदे अन् हिंदूंना कायदे’ ही कसली धर्मनिरपेक्षता ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दीपप्रज्वलन करतांना श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि श्री. सुनील घनवट

जळगाव : अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांना अनुदान दिले जाते. त्याप्रमाणे हिंदूंच्या धार्मिक स्थळांना अनुदान मिळत नाही. आंध्रप्रदेशात मौलवींना साडेआठ सहस्र आणि हिंदूंच्या मंदिरातील पुजार्‍यांना अडीचशे रुपये याप्रमाणे मासिक वेतन दिले जाते. ‘अन्य धर्मियांना फायदे अन् हिंदूंना कायदे’ ही कसली धर्मनिरपेक्षता ?, असा परखड प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थित केला. येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ५ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत दोन सत्रांत ही कार्यशाळा पार पडली. श्री. श्रेयस पिसोळकर आणि श्री. उमेश जोशी यांनी कार्यशाळेच सूत्रसंचालन केले.

श्री. सुनील घनवट या वेळी पुढे म्हणाले, ‘‘सर्व धर्मियांना समान संधी मिळायला हवी. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्येच ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ या धर्मग्रंथातून ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना मांडली आहे.’’ शंखनादाने कार्यशाळेला आरंभ झाला. त्यानंतर सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि श्री. सुनील घनवट यांनी दीपप्रज्वलन केले. ‘ईश्‍वराचे गुण आत्मसात करून, तसेच स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून भगवंताची कृपा संपादन करणे’ हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी साधना’ या विषयावरील मार्गदर्शनाच्या वेळी सौ. क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, ‘‘आपले जीवन आनंदी करायचे असेल, तर काळानुसार अधिकाधिक वेळ कुलदेवतेचा नामजप करावा, तसेच आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप प्रतिदिन किमान अर्धा घंटा तरी करावा. नामजपाला प्रार्थना आणि कृतज्ञता यांची जोड द्यावी. प्रत्येक कृती करण्यापूर्वी भगवंताला प्रार्थना आणि कृती संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करावी. यामुळे कर्तेपणा स्वतःकडे न रहाता ‘ईश्‍वराच्या कृपेने झाले’, असा भाव निर्माण होतो.’’

१. कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात सहभागी धर्मप्रेमींनी उत्तम वक्ता होण्याच्या अनुषंगाने दिलेल्या नियोजित विषयांवर ४ मिनिटांत त्यांचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला.

२. त्यानंतर श्री. प्रशांत जुवेकर यांनी समितीच्या वतीने वर्षभरात आयोजित केले जाणारे धर्मशिक्षणवर्ग, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा आदी उपक्रमांविषयी माहिती दिली.

३. सौ. क्षिप्रा जुवेकर आणि सौ. वैष्णवी पिसोळकर यांनी ‘स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

४. शेवटी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात माझा सहभाग’ याविषयी उपस्थितांची दोन गटांत चर्चा घेण्यात आली. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी धर्मकार्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यशाळेत समारोपप्रसंगी धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत !

जळगाव येथील कार्यशाळेत सहभागी धर्मप्रेमी

१. मी आजवर जीवनात अनेक ‘सेमिनार’मध्ये (कार्यशाळा) सहभागी झालो; पण आज जे शिकलो, ते मला कुठेच शिकायला मिळाले नाही. माझ्या आजवरच्या जीवनात अध्यात्म ‘मिसिंग’ (अंतर्भूत नव्हते) होते, ते मला आज शिकायला मिळाले ! – श्री. समीर कानडे, धुळे

२. ‘आज आपण वेगळ्याच विश्‍वात आहोत’, असे वाटत होते. हे विश्‍व पुष्कळ चांगले असून ते सोडून जावेसे वाटत नाही. – श्री. अजय नेवे, यावल

३. आजच्या कार्यशाळेत अनेक विषय शिकायला मिळाले. ‘साधना आणि व्यक्तिमत्त्व’ यांविषयीही पुष्कळ माहिती मिळाली. ते सर्व कृतीत आणण्याचा निश्‍चित प्रयत्न करीन ! – श्री. रोहित परिहार, सह-व्यवस्थापक, मुथुत फायनान्स (जळगाव शाखा)

झोपेचा त्याग करून तळमळीने कार्यशाळेत सहभागी झालेले धर्मप्रेमी !

असे धर्मप्रेमी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे !

कार्यशाळेला उपस्थित काही धर्मप्रेमींना आदल्या रात्री पूर्ण झोप घेता आली नव्हती, तरी ते पूर्ण दिवस उत्साहाने कार्यशाळेत सहभागी झाले होते. नाशिक येथून आलेले श्री. वैभव बाविस्कर, तसेच सोनगीर येथून आलेले धर्मप्रेमी सर्वश्री भावेश वाणी, योगेश चौधरी हे रात्री केवळ ३-४ घंटे झोप घेऊनच कार्यशाळेत सहभागी झाले होते. पाळधी येथील श्री. जितेंद्र चौधरी रात्रभर मुद्रणालयात काम करून सकाळी कार्यशाळेसाठी आले होते, तसेच रात्री ते पुन्हा मुद्रणालयात कामाला गेले.

गटचर्चेत हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचा धर्मप्रेमींचा निश्‍चय !

१. कार्यशाळेत घेण्यात आलेल्या गटचर्चेत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयीच्या गटचर्चेत एकदम नवीन असूनही सर्व धर्मप्रेमींनी मोकळेपणाने आणि सक्रीय सहभाग घेतला.

३.  राष्ट्र-धर्मपर उपक्रमांचे नियोजन करण्याच्या गटचर्चेत अनेक धर्मप्रेमींनी उपक्रमांचे दायित्व उत्स्फूर्तपणे घेतले. हिंदु राष्ट्राच्या जनजागृतीसाठी बैठका घेणे, धर्मजागृतीपर फलकप्रदर्शन लावणे, धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, हिंदूंना धर्मशिक्षण देणे आदी उपक्रमांत सहभागी होण्याची सिद्धता या वेळी अनेकांनी दर्शवली.

धर्माभिमान्यांचा सहभाग

कार्यशाळेसाठी नाशिक, धुळे, जळगाव या शहरांसह यावल, साकळी, धानोरा, भुसावळ, कुर्‍हा, एरंडोल, पाळधी, डांभुर्णी या गावांतून ४६ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. धर्मशिक्षणवर्गातील बारी, नेवे आणि भोळे कुटुंबियांनी कार्यशाळेत उपस्थित राहून अनेक सेवांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *