झारखंड, बंगाल, ओडिशा, देहली आणि हरियाणा राज्यांमध्ये विविध उपक्रम !
देहली येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त प्रवचन आणि सामूहिक प्रार्थना !
देहली : शहरात हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने सावित्रीनगर येथील शिव मंदिरामध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याचे महत्त्व’ या विषयांवर नुकतेच प्रवचन घेण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संगीता गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा लाभ ३५ हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. याप्रसंगी अक्षय्य तृतीयेविषयी शास्त्रीय माहिती असलेली पत्रके वितरण करण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, याकरता सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
राऊरकेला (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाला साकडे आणि प्रवचन
राऊरकेला (ओडिशा) – हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येथील झिरपानी श्री जगन्नाथ मंदिर येथे देवतांना साकडे घातले. या वेळी समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी प्रवचन घेऊन ‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण’ या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यापक कार्याचा परिचय देणारी ध्वनिचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये मंदिरांची स्वच्छता अन् सामूहिक प्रार्थना यांचे आयोजन
कोलकाता : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत झारखंडमधील धनबाद, कतरास आणि बंगालमधील हथियार येथे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, याकरता सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या वेळी मंदिरामध्ये उपस्थित भाविक आणि धर्माभिमानी यांंच्या उपस्थितीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
फरिदाबाद येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर प्रवचन
फरिदाबाद (हरियाणा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ मे या दिवशी येथील सैनिक कॉलनीमध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याचे महत्त्व’ या विषयांवर प्रवचन घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूनम किंगर आणि सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्र
अशाच प्रकारचे प्रवचन अन्य मंदिरात आयोजित करण्याची इच्छा एका जिज्ञासूने प्रदर्शित केली.
फरिदाबाद (हरियाणा) येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे विनामूल्य वितरण
फरिदाबाद (हरियाणा) : संतकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिमास सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी येथील ‘डी.एल्.एफ्.’ औद्योगिक वसाहत, सेक्टर ३१ मधील भगवान श्रीराम विद्यालय आणि धीरजनगर ऐतमातपूर मधील बी.के. इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयांमध्ये शालोपयोगी वस्तूंचे विनामूल्य वितरण करण्यात आले. हे वितरण प्रतिष्ठानचे श्री. जीवन शर्मा, सौ. सीमा शर्मा आणि श्रीमती सरोज गुप्ता यांच्या हस्ते विद्यालयांतील मुलांना करण्यात आले.
क्षणचित्र
बी.के. इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मंजू शर्मा आणि भगवान श्रीराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निशा शर्मा यांना हा उपक्रम अतिशय आवडला. श्रीमती मंजू शर्मा यांनी विद्यालयाचे शिक्षकांसाठी आनंदी जीवनासाठी कोणते प्रयत्न करावे, याविषयी प्रवचन घेण्यासाठी संस्थेला निमंत्रण दिले.