मुंबई : दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे धर्मप्रेमींच्या निदर्शनास आले. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याने हिंदु जनजागृती समिती आणि दहिसर येथील स्थानिक धर्मप्रेमी यांनी या आस्थापनाच्या दहिसर येथील कार्यालयात जाऊन ही विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन या आस्थापनाचे व्यवस्थापक भावेश जगरा यांना दिले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री माणिकसिद्ध भांबुरे, संजय सिंग, सुशील सावंत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भावेश जगरा यांचे सहकार्याचे आश्वासन आणि सकारात्मक प्रतिसाद !
निवेदन स्वीकारल्यानंतर व्यवस्थापक भावेश जगरा यांनी खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवरील देवतांची चित्रे लवकरात लवकर काढण्याचे आश्वासन दिले. (देवतांची होणारी विटंबना लक्षात आल्यावर ती थांबवण्यासाठी लगेच कृती करण्याविषयी तत्पर असलेले भावेश जगरा यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी भावरा म्हणाले, ‘‘अशाप्रकारे देवतांचे छायाचित्र छापणे योग्य नाही, असा विचार आला होता; मात्र तो विचार मागे पडून देवतांचे चित्र आमच्याकडून छापले गेले.’’ (हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून कळत नकळत देवतांचा अवमान होऊन पाप होत रहाते. यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात