मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा गलथान कारभार १४ वर्षांनंतर उघड ! या प्रकरणातील संबंधितांची तत्परतेने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच श्री भवानीभक्तांची अपेक्षा !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : महाराष्ट्राची कुलदेवता असणार्या श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागिने, वाहिक वस्तू आणि पुरातन काळातील नाणी गहाळ झाली आहेत, हे धक्कादायक वास्तव पदभार हस्तांतराच्या वेळी उघड झाले आहे. (या वस्तू गहाळ होतातच कशा ? देवीच्या खजिन्यावर कोणाचेच नियंत्रण नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ४० वर्षांपूर्वी मंदिरातील दप्तरात नोंद असलेले अनेक पुरातन दागिने गहाळ झालेले आहेत. ‘भाविकांच्या श्रद्धेशी खेळणार्यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा’, अशी मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
१. श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी दागिने, सोने-चांदीच्या वस्तू आणि नाणी अर्पण करण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून चालू आहे. मंदिरात एका नोंदवहीत त्यांची नोंद ठेवली जाते. वर्ष २००२ पर्यंत धार्मिक व्यवस्थापक हे स्वतंत्र पद कार्यरत होते. फेब्रुवारी १९८० मध्ये अंबादास भोसले यांनी हा सर्व मौल्यवान खजिन्याचा पदभार महादेव दीक्षित यांच्याकडे सोपवला. नोव्हेंबर २००२ मध्ये दीक्षित यांचे वार्धक्याने निधन झाल्यानंतर खजिन्याच्या किल्ल्या मंदिराचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी स्वतःकडे घेतल्या. त्यांनी सलग ३ वर्षे हा खजिना हाताळला आणि वर्ष २००५ मध्ये सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्यांची मंदिराच्या नोंदवहीत नोंद केली.
२. तेव्हा नोंदवलेल्या अनेक मौल्यवान वस्तू १४ वर्षांनंतर अचानक गहाळ झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. नाईकवाडी यांच्याकडे पदभार असतांना खजिन्यात तफावत झाल्याची शंका नव्याने पदभार स्वीकारणार्या अधिकार्याने उपस्थित केली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सेवानिवृत्तीनंतर नाईकवाडी यांनी आपला पदभार लेखापाल सिद्धेश्वर इंदोले यांच्याकडे सोपवला.
३. ‘त्या कालावधीत काही वस्तूंमध्ये तफावत असल्यास आपण त्यास उत्तरदायी नसू’, अशा स्पष्ट शब्दांत सांगून इंदोले यांनी नाईकवाडी यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे.
४. पदभार देतांना खजिन्यातील महत्त्वाचे दागिने ठेवण्यात येणार्या पेट्या उघड्या होत्या. अनेक पेट्यांच्या किल्ल्या हरवल्या आहेत, तर काही पेट्यांची कुलूपे तोडून त्या उघडाव्या लागल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात