बेळगाव : आपण दिवसभर करत असलेली प्रत्येक कृती त्यामागील शास्त्र समजून आचरणात आणल्यास हिंदु संस्कृतीचे जतन होईल. आधुनिकतेच्या नावाखाली महिलांनी अयोग्य वेशभूषा करणे, कुंकू न लावणे यांसह करत असलेल्या अन्य अयोग्य कृतींमुळे समाजात अधर्माचरण वाढत आहे. शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था बिघडत आहे. त्यातूनच महिलांवर अत्याचारासारख्या गंभीर घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु संस्कृती समजून घेऊन धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी केले. त्या ९ मे या दिवशी हालशिरगुर (तालुका रायबाग) येथे श्री महालक्ष्मीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
या वेळी ज्ञानयोग आश्रमाच्या मातोश्री पू. अक्कमहादेवी, सिद्धारूढ मठाच्या पू. मातोश्री काक्यायणी, तसेच महिला सबलीकरण संस्थेच्या कु. मंजुळा मुनोवळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ देवीची ओटी भरून करण्यात आला. याचा लाभ ५०० पेक्षा अधिक महिलांनी घेतला.