नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच हिंदु धर्माचे कार्य करणार्या धर्मबांधवांचे आपत्काळात रक्षण व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. यात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, सनातन प्रभातचे वाचक आणि नागरिक यांनी सहभाग घेतला.
शहरातील रामकुंड परिसरातील गंगा गोदावरी मंदिर, सराफ बाजारातील मुरलीधर मंदिर, पंचवटी परिसरातील विठ्ठल मंदिर, सिडकोतील दुर्गामाता मंदिर, तुळजाभवानी मंदिर, इंदिरा नगरमधील मोदकेश्वर मंदिर, कॉलेज रोडचे रुद्राक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि गंगापूर रोड परिसरातील रेणुकामाता मंदिर येथे मंदिर स्वच्छता करण्यात आली. शहरात काही ठिकाणी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ असे प्रवचन घेण्यात आले.
शहरातील दहीपूल परिसरातील कानडे मारुति, गंगापूर परिसरातील श्री श्रेत्र दत्तधाम पेठ गोवर्धन, मुंबई नाका येथील श्री कालिका देवी मंदिर, इंदिरानगर येथील मारुति मंदिर येथे साकडे घालण्यात आले. दक्षिणमुखी हनुमान मंदिर, पंचवटी परिसरातील मारुति मंदिर येथे रामनामाचा नामजप करण्यात आला.
निफाड-लासलगाव आणि येवला येथेही उपक्रम !
निफाड-लासलगाव परिसरातही विविध उपक्रम घेण्यात आले. लासलगाव शहरातील महालक्ष्मी देवी, तर निफाड येथील श्रीराम मंदिरात साकडे घालून स्वच्छता करण्यात आली. याच परिसरात जळगाव येथे मारुति मंदिरात प्रवचन घेण्यात आले. मानूर फाटा येथे मारुति मंदिरात प्रवचन घेण्यात आले. प्रवचनाला ४०० हून अधिक भाविक उपस्थित होते.
येवला तालुक्यातील वडगाव परिसरातील मारुति मंदिरात ह.भ.प. कुठे महाराज यांच्या सप्ताहात रामनामाचा जप करण्यात आला. तेव्हा ८०० हून अधिक भाविक उपस्थित होते. मारुति मंदिर, बुरुड गल्ली येथे, तसेच हनुमान मंदिरात रामनामाचा जप करून मंदिर स्वच्छताही करण्यात आली.