जळगाव : येथे पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच पेट्रोल-डिझेल हेही जीवनातील आवश्यक घटक आहेत. भारतात बहुतांश ठिकाणी पेट्रोल अल्प देणे, भेसळयुक्त पेट्रोल देणे आदी माध्यमांतून सर्वसामान्य जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे. अशा घटनांची तक्रार प्रविष्ट करूनही पाहिजे तशी कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशी फसवणूक करणार्या दोषींवर कठोर शासन करून जनतेची लुबाडणूक थांबवावी.
२. श्री माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुंफेजवळ प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी आरती करण्यात येते. आरतीमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक भक्ताकडून श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड आतापर्यंत प्रत्येकी १ सहस्र रुपये घेत होते. हीच आकारणी आता दुप्पट म्हणजेच २ सहस्र रुपये करण्याचा निर्णय नुकताच बोर्डाने घेतला आहे. आरतीचे पैसे आकारण्याची खरेतर आवश्यकताच नाही. येथे येणार्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा देण्याकडे बोर्डाने लक्ष द्यायला हवे. हिंदूंची लूट थांबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतांना स्थानिक आमदार श्री. शिरीष चौधरी, पुरोहित संघाचे श्री. विनीत भाऊ जोशी, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण बोरसे, श्री. मयूर चौधरी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आशिष दुसाने, श्री. हितेश नारखेडे, विश्व हिंदू परिषदेचे श्री. किरण कुंभार, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.