धर्मरक्षणाकरिता अधिवक्त्यांनी संघटित होऊन कायदेशीर लढाई लढली पाहिजे ! – अधिवक्ता एस्.आर्. कोरी
विजयपूर (कर्नाटक) : हिंदु धर्म फार पूर्वीपासून अन्याय सहन करत आला आहे. आता धर्माच्या रक्षणाकरता अधिवक्त्यांनीही संघटित होऊन कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असे प्रतिपादन अधिवक्ता एस्.आर्. कोरी यांनी येथील अधिवक्त्यांच्या बैठकीत केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ मे या दिवशी येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विजयपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता महिपती एच्. खासनिस, अधिवक्ता अडीवेप्पा बिरादार, अधिवक्ता बसवराज एस्. सोरगांव, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे बागलकोट जिल्हा समन्वयक श्री. वेंकटरमण नायक उपस्थित होते.
या बैठकीला संबोधित करतांना अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी जीवनातील साधनेचे महत्त्व, न्यायालयीन कार्य करत असतांना साधना कशी करावी, धर्माचरण केल्यावर होणारे पालट, तसेच राष्ट्र, धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्या रक्षणामध्ये अधिवक्त्यांची भूमिका इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
बैठकीत न्या. अडीवेप्पा बिरादार म्हणाले, ‘‘प्रत्येकाने जीवनात अध्यात्म, योग आणि ध्यान या सूत्रांचा अंगीकार केला पाहिजे.’’
‘बार असोसिएशनचा धर्मरक्षणासाठी पाठिंबा राहील’, असे अधिवक्ता महिपती एच्. खासनिस यांनी या वेळी सांगितले.
विशेष : या बैठकीसाठी सभागृहाची सिद्धता, उपाहार व्यवस्था, सत्कार व्यवस्था, वाहन व्यवस्था आदी सेवांचे नियोजन अधिवक्त्यांनी केले. बैठकस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.