बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहू ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’, बांगलादेश
रामनाथी (गोवा) : बांगलादेशात हिंदूंची स्थिती दयनीय असून बलात्कार, हिंदूंची घरे जाळणे-लुटालुट मंदिरांची तोडफोड या घटना तिथे आता नित्याच्या झाल्या आहेत. बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी तेथे १८ ते २० टक्के असलेली हिंदूंची लोकसंख्या अनेक प्रदेशांमध्ये १ ते ८ टक्के इतकी घटली आहे. बांगलादेश सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी निष्क्रीय आहे. भारत सरकारनेच आता निष्क्रीयता सोडून आम्हा बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. बांगलादेशामध्ये हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असे ठाम प्रतिपादन बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी केले. ते ३० मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्या दिवसाच्या प्रथम सत्रात ते बोलत होते. या वेळी ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह, हिंदु जनजागृती समितीचे प्रयाग (उत्तरप्रदेश) समन्वयक श्री. गुरुराज प्रभु आणि कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा हे व्यासपिठावर उपस्थित होते. ‘बांगलादेशाच्या राज्यघटनेतच ‘इस्लामी राष्ट्र’ असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारलाही निवेदन देण्यात आलेे; पण काही निष्पन्न झाले नाही. केवळ देवाच्या आशीर्वादामुळे आम्ही तेथे हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहोत’, असेही त्यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या प्रारंभी संतांनी अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आलेे. सिंधुदुर्ग येथील प.पू. दास महाराज यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि रत्नागिरी येथील प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी दिलेल्या आशीर्वादपर संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी केले. अधिवेशनाला उपस्थित असलेले पू. चंद्रकांत महाराज शुक्ल यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य समन्वयक श्री. संतोष आळशी यांनी केला.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी पडद्यावर (स्क्रीनवर) बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या काही घटनांची दृश्ये दाखवली. सामूहिक बलात्कार झालेल्या महिलांच्या कहाण्या, हिंदूंच्या घरांवर धर्मांधांकडून केली जाणारी आक्रमणे, मंदिरांची केली जाणारी जाळपोळ यांवर प्रकाश टाकणारी ही ध्वनीचित्रफीत पाहून उपस्थित सर्वच हिंदुत्वनिष्ठांच्या मनात या अन्यायाविषयी चीड निर्माण झाली.
२. ‘आम्ही बांगलादेशामधील हिंदूंच्या पाठीशी आहेत. तेथील हिंदूंच्या न्यायासाठी प्रयत्नरत राहू’, असे आश्वासन सूत्रसंचालक श्री. कार्तिक साळुंखे यांनी अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने दिले.
३. ‘बांगलादेश की हिंदूंओ पर हो रहा अत्याचार, नही सहेगा हिंदुस्थान !’ अशा घोषणा देऊन बांगलादेशी हिंदूंना समर्थन देण्यात आले.
भगवंताच्या आशीर्वादामुळेच हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत रहाणे शक्य ! – अधिवक्ता रवींद्र घोष
‘भगवंताच्या आशीर्वादामुळेच आम्ही बांगलादेशामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करू शकत आहोत. तेथील हिंदूंसाठी कार्यरत रहाणे, हीच माझी साधना आहे’, असा भाव अधिवक्ता रवींद्र घोष यांनी व्यक्त केला.
‘बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या भयानक अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठीची उपाययोजना काय ?’ असा प्रश्न उपस्थित करून ‘बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ‘संतांचे आशीर्वाद आणि सदिच्छा’ हाच उपाय आहे’, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले. हिंदूंच्या रक्षणासाठी सरकार, पोलीस-प्रशासन यांच्याकडे निरंतर प्रयत्न करूनही आतापर्यंत कोणताच सकारात्मक प्रतिसाद अधिवक्ता घोष यांना मिळाला नाही. या प्रयत्नांच्या अंती ‘बांगलादेशातील हिंदूंसाठी भगवंतच आधार आहे’, असे अधिवक्ता घोष यांना मनोमन वाटत असल्याचे त्यांच्या भाषणातून प्रतित होत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून, अनेक आक्रमणे झेलून हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असलेले अधिवक्ता घोष यांना सर्वसामान्य हिंदूंप्रती असलेली आत्मियता आणि तळमळही हिंदुत्वनिष्ठांना प्रेरणादायी ठरली.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन शक्तीप्रदर्शन करणे आवश्यक ! – अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदु फेडरेशन
‘सर्व धर्मांत हिंदु धर्म उत्तम धर्म आहे. तो सर्व प्राणीमात्रांच्या हिताचा विचार करतो. हिंदु धर्माचे रक्षण आणि प्रचार केला पाहिजे. हिंदूंची संख्या जगभरात न्यून होत चालली आहे. जगभरात हिंदूंसाठी कार्य करणार्या अनेक संघटना आहेत. त्यांनी संघटित होऊन शक्तीप्रदर्शन करायला हवे.’ या वेळी श्री. अजय सिंह यांनी ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’ची स्थापना आणि तिचे देश-विदेशातील कार्य यांचीही माहिती दिली.
हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या आत्म्याला उज्ज्वल करत आहे ! – अजय सिंह
हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या आत्म्याला उज्ज्वल करत आहे. हिंदूंना संस्कार शिकवण्याचे काम करत आहे.
भारतासह जगभरात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याविषयी मिळाला दैवी संकेत !
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदूंना संघटित करण्यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयी उद्बोधन चालू असतांना सभागृहाच्या छतावरून काही वानर उड्या मारत गेले. उद्बोधनामध्ये श्री. अजय सिंह नेपाळविषयी बोलत होते. नेपाळ ही सीतेची जन्मभूमी आहे. हनुमंतही सीमापार करून लंकेत गेले आणि रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात सहभाग घेतला. यावरून ‘केवळ भारतात नाही, भारताची सीमा पार करून संपूर्ण विश्वभरात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असा दैवी संकेत हनुमंताने वानरांच्या माध्यमातून दिला.
धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश झाल्यापासून नेपाळमध्ये भारतविरोधी शक्तींच्या कारवायांमध्ये वाढ ! – गुरुराज प्रभु
एक षड्यंत्र आखून राजेशाही असलेल्या नेपाळमध्ये लोकशाही थोपवली गेली. त्या वेळी तेथील जनतेने संघटितपणे विरोध केला नाही. नेपाळ गिळकृंत करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. तेथील हिंदूंचे आणि बौद्धांचे धर्मांतर करण्यासाठी शेकडो चर्च कार्यरत आहेत. नेपाळमध्ये जेव्हा लोकशाही आणली गेली, तेव्हा राज्यघटनेमध्ये नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी जनतेने आवाज उठवला; पण राज्यघटनेमध्ये ऐनवेळी ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडून तेथील शासनकर्त्यांनी नेपाळी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. नेपाळमध्ये पूर्वी राजेशाही असतांना सनातन धर्मरक्षणासाठी कार्य केले जात होते. नेपाळ धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश झाल्यापासून तेथील भारतविरोधी शक्तींच्या कारवाया वाढल्या आहेत.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांविषयी नेपाळमध्ये आदर
‘नेपाळमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषय आदर आहे. याच संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत, अशी भावना नेपाळवासियांमध्ये आहेे’, असे श्री. गुरुराज प्रभु यांनी सांगितले.