सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी मला कर्नाटकातही माहिती मिळाली असून याविषयी मी अवगत आहे. कर्नाटक शासनाने कायदा करण्यापूर्वी त्या विषयातील तज्ञांचे मत जाणून घ्यायला हवे. कर्नाटक राज्यातील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझाही विरोध आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील सदानंद स्वामी मठाचे मठाधिपती प.पू. श्री दामोदरानंद सरस्वतीजी यांनी केले. येथे एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कर्नाटक राज्यात होऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी माहिती दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. रविकुमार कोठाळे उपस्थित होते.
श्री. मंगेश निकम यांनी त्यांना महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयीही विस्तृत माहिती दिली. कर्नाटकातही या कायद्याला समाजातील सर्वच स्तरांतून विरोध असल्याचे श्री. निकम यांनी सांगितले. या वेळी प.पू. महाराजांनी कर्नाटकमधील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करून समितीच्या कार्यात सक्रिय सहभागी होणार असल्याचेही सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात