अध्यात्माच्या आधारेच हिंदु राष्ट्र निर्माण होऊन रामराज्याची स्थापना होईल ! – पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज, महात्यागी सेवा संस्थान, गोंदिया, महाराष्ट्र
आज समाज अराजकतेच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे तरुणांचा उत्साह आणि वृद्धांचा अनुभव यांच्या साहाय्याने समाजामध्ये धर्मजागृती केली पाहिजे. आज आम्ही बुद्धीने म्हणजे शिक्षणाने प्रगती केली आहे; मात्र मनाने अजूनही कमकुवत आहोत. त्यामुळे आपल्यात भगवद्भक्ती निर्माण करून आध्यात्मिक बळ मिळवणे आवश्यक आहे. अध्यात्माच्या आधारेच हिंदु राष्ट्र निर्माण होऊन रामराज्याची स्थापना होईल, असे प्रतिपादन गोंदिया येथील महात्यागी सेवा संस्थानचे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज यांनी केले. ३० मे यादिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ‘धर्मपरिवर्तनाची समस्या आणि उपाय’ या विषयावरील उद्बोधनसत्रात ते बोलत होते. या सत्रात गुजरात येथील भागवत कथावाचक पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, हिंदु जागरण मंचाचे दक्षिण आसाम प्रांत विधीप्रमुख अधिवक्ता राजीव नाथ आणि देहली येथील अग्नीवीर संघटनेचे श्री. सतीश वैद यांनीही संबोधित केले.
पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘देशातील ऋषिपरंपरा संकटात आहे. हिंदु धर्म जिवंत ठेवायचा असेल, तर या परंपरा टिकवल्या पाहिजेत. त्यामुळे हिंदु धर्म पुन्हा पुनर्जीवित होईल. त्याकरता गावांमध्ये जाऊन यज्ञ, रामकथा यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन आणि संघटन केले पाहिजे. राम साक्षात धर्म आहे. रामाच्या पदचिन्हावर चालून रामाचा आदर्श सर्वांमध्ये निर्माण केला पाहिजे.’’
हिंदु धर्माला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, भागवत कथावाचक
विदेशातील लोक हिंदु धर्माने प्रभावित होऊन हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी पुढे येत आहेत; परंतु भारतातील हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत, ही दु:खाची गोष्ट आहे. आज हिंदूच हिंदु धर्माची अवहेलना करत आहेत. आदिवासी क्षेत्रात ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होऊन सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे अन्यथा येणारा काळ हिंदूंसाठी कठीण असेल.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच धर्मरक्षणाचे कार्य करत आहे ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, भागवत कथावाचक
हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. ही शेवटची संधी आहे. आता हिंदू जागृत झाले नाही, तर त्यांना पुढे जागृत करण्यासाठी कोणी येणार नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संत आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण होईल, याची मला खात्री आहे.
हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घ्यावा ! – सतीश वैद, अग्नीवीर संघटना, देहली
अनेक धर्मांध ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु नाव धारण करून सोयीसुविधा उपभोगत आहेत. अनुसूचित जातीतील लोक हे धर्मांतराचे ‘सॉफ्ट टार्गेट’ झाले आहेत; मात्र तेच कट्टर हिंदू आहेत. औरंगजेबाने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावर या समाजाने मैला वाहणे स्वीकारले; परंतु धर्मांतर स्वीकारले नाही. हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घ्यावा.
प्रति ३ मासांनी हिंदू अधिवेशनांची आवश्यकता ! – सतीश वैद
हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या आयोजनामागील उद्देशच हिंदु राष्ट्र पुढे वाचवू शकतो. सनातन संस्था आणि संत हेच हिंदु धर्माला वाचवू शकतात. एकेठिकाणी मी व्याख्यानासाठी गेल्यावर एका युवकाने ‘हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे होऊन हिंदु धर्म अजूनपर्यंत टिकून कसा आहे ?’ असा प्रश्न मला विचारला होता. त्या युवकाने अधिवेशनाला आलेल्या या हिंदु विरांना पाहिले असते, तर ‘याच हिंदु योद्ध्यांमुळे हिंदु धर्म जिवंत आहे’, हे त्याच्या लक्षात आले असते. ‘घरवापसी’ करण्यासाठी अशा प्रकारचे अधिवेशन दर ३ मासांनी होणे आवश्यक आहे.
वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखणे शक्य ! – अधिवक्ता राजीव नाथ
‘सिलचर (आसाम) येथे हिंदूंचे होणारे धर्मपरिवर्तन रोखण्यासाठी केलेले प्रयत्न’ या विषयावर कार्य करतांना आलेले अनुभव हिंदु जागरण मंचाचे अधिवक्ता राजीव नाथ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ईशान्य भारतात ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडत आहेत. अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यावर आम्ही हिंदु मुलीला भेटून हिंदु धर्म आणि इस्लाम धर्म यांची वास्तविक माहिती करून देतो. त्यानंतर मुलीने मुसलमान होण्यापेक्षा मुलाने हिंदु धर्म स्वीकारावा किंवा ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट’च्या अंतर्गत विवाह करावा, जेणेकरून मुसलमानांना ‘तोंडी तलाख’ देता येऊ शकत नाही’, असे पर्याय सुचवतो. त्यातूनही लव्ह जिहादची घटना घडलीच, तर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवून प्रयत्न करतो. प्रबोधन केल्यानंतर हिंदु मुलींचे मनपरिवर्तन होऊन लव्ह जिहादच्या घटना रोखण्यात यश येते. ईशान्य भारतात ख्रिस्तीकरणाचीही समस्या मोठी आहे. आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. त्यांना रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नेले जाते. अशा घटनांना रोखण्यासाठी आम्ही काही ठिकाणी रविवारची साप्ताहिक सुट्टी अन्य दिवशी करवून घेतली. ‘रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने कर्मचार्यांना त्यांची व्यक्तिगत कामे करण्यासाठी रविवार सोडून अन्य दिवशी सुट्टी द्यावी’, अशी मागणी आम्ही केली. परिणामस्वरूप रविवारी चर्चमध्ये जाणार्या हिंदूंच्या संख्येत घट झाली.’’