Menu Close

प्रथम उद्योगपती अधिवेशनात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत !

२८ मे या दिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत उद्योगपती परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम उद्योगपती अधिवेशनाच्या तिसर्‍या सत्रात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आहुती देण्याची संधी सोडू नका ! – श्री. राजेंद्र पारेख, बेंगळूरू, कर्नाटक

श्री. राजेंद्र पारेख, बेंगळूरू, कर्नाटक

भारताला विश्‍वगुरुपदावर आरूढ करण्याच्या कार्याची पताका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतली आहे. त्यासाठी त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवावे; कारण हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविना विश्‍वगुरु होण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. ब्राह्मण हे हिंदुत्वाचा आत्मा आहेत. क्षत्रिय हे शक्ती, वैश्य हे वैभव, तर शूद्र हे स्वाभिमान आहेत. निधर्मींच्या या राज्यात ज्योतींच्या ज्वाला बनण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात कोणत्याही प्रकारची आहुती देण्याची संधी मिळाली, तर उद्योगपतींनी ती सोडू नये.

राजेंद्र पारेख यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘हिंदूंंनो उठा, तुमचे पुरुषत्त्व आणि बल ओळखून जागे व्हा’, याची जाणीव सनातन करून देत आहे. हे पौरुषत्त्व जागृत होईल, त्याच्या पुढच्या क्षणी आपण हिंदु राष्ट्रात पाऊल ठेवलेले असेल. याचीच आठवण करून देण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी सिद्ध केलेले पूर्णकालीन साधक महर्षि दधिची यांच्याप्रमाणे आहेत. त्यांनाही मी नमन करतो. हिंदु राष्ट्राच्या यज्ञात आहुती देणारे तुम्ही साधक अभिनंदनास पात्र आहात. तुम्ही करत असलेल्या कार्याचे फळ भविष्यात दिसून येणार आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा हिंदु राष्ट्राचा संकल्प साकार होतांना दिसत आहे. वर्तमान परिस्थितीत जे घडत आहे, ती येणार्‍या हिंदु राष्ट्राची झलक आहे.

सनातनचे सांगितलेली तणाव निर्मूलनाची प्रक्रिया सर्व आस्थापनांना हवी आहे ! – श्री. सुदीश नायक, सदस्य, राजपूत सारस्वत ब्राह्मण संघ, उडुपी, कर्नाटक

श्री. सुदीश नायक, सदस्य, राजपूत सारस्वत ब्राह्मण संघ, उडुपी, कर्नाटक

म्हापसा, गोवा येथे वर्ष २००० मध्ये झालेल्या एका जाहीर सभेत कुलदेवता आणि इष्टदेवता यांच्या नामजपाचे महत्त्व मला कळले. काही वर्षांनी मी उडुपी येथे व्यवसाय चालू केला. तेथे कार्यालयात सनातनच्या सत्संगासाठी जागा दिली. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात साप्ताहिक सत्संग अन् सनातनचे निरनिराळे उपक्रम घेणे, ग्रंथवितरण करणे चालू केले. सध्या माझ्या कार्यालयात साप्ताहिक सत्संग होतो. ७७ कर्मचारी त्याचा लाभ घेत आहेत. एखाद्या वेळी सत्संग न झाल्यास त्यांना रूखरूख वाटते. सनातनने सांगितलेल्या नामजपामुळे ताण न्यून होत असल्याचे कर्मचारी सांगतात. सनातन सांगत असलेली तणाव निर्मूलनाची प्रक्रिया आता सर्व आस्थापनांना हवी आहे.

समाजाचा आध्यात्मिक स्तर उंचावणे, हे व्यावसायिकांचे दायित्व ! – आनंद पाटील, सदस्य, आर्किटेक्ट असोसिएशन, कोल्हापूर

आनंद पाटील, सदस्य, आर्किटेक्ट असोसिएशन, कोल्हापूर

१. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पोलीस, न्याय यांचा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. तो उच्च स्तरावर आणण्याचे दायित्व व्यावसायिकांचे आहे. त्यांना सात्त्विक साहित्य देऊन प्रबोधन करणे, हे आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी परिणामकारक आहे.

२. ईश्‍वरी अधिष्ठानाने व्यवसायात सहजता निर्माण होते, याची मी अनुभूती घेतली. सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांना व्यावसायिक म्हणून साहाय्य करण्याचा माझा मानस होता. मी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिदिन प्रसिद्ध होणार्‍या बोधचित्राची पुस्तिका सिद्ध करून ती नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक यांना दिली. त्यांना पुस्तिका आवडल्याने त्यांनी शाळांमध्येही गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषित स्वरूपात दिली. सहउद्योजकांच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन, विवाह, समारंभ आदी प्रसंगी त्यांना मिठाई किंवा पुष्पगुच्छ देण्यापेक्षा परात्पर गुरुदेवांचे ग्रंथरूपी ज्ञान सर्वांपर्यंत पोचण्यासाठी ग्रंथ भेट दिले.

३. कोल्हापूर येथील देवीचे दर्शनमंडप बनवण्याची संधी मला मिळाली. हे काम करतांना पुष्कळ अनुभूती आल्या आणि ते सहजतेने होत गेले. काम करतांना ‘येथे येणारा प्रत्येक भाविक आनंदी होऊन त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, असे वाटत होते. हे सर्व ईश्‍वरी कृपा आणि संतांंचे आशीर्वाद यांमुळे होते. आपण केवळ भाव ठेवून प्रयत्न करायचे असतात.

४. सनातन आश्रमाचे बांधकाम करण्याचीही संधी मला मिळाली. इतर कोणत्याही कामापेक्षा आश्रमाच्या बांधकामाची सेेवा करतांना १ सहस्रपट अधिक आनंद मिळाला. ‘हे ईश्‍वराचे पूर्वनियोजित कार्य असून त्यानेच माझे नियोजन केले आहे’, असे मला वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दाखवलेला साधनेचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे ! – दिनेश एम्.पी., व्यावसायिक, मंगळुरू

दिनेश एम्.पी., व्यावसायिक, मंगळुरू

वर्ष २००२ मध्ये मी व्यापार चालू केला. व्यापार वाढत गेल्यावर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत व्यापार करण्याची माझी इच्छा होती. एका साधकाच्या माध्यमातून मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. यानंतर २-३ वर्षांनी ‘व्यवसाय वाढवणे, हा माझ्या जन्माचा उद्देश नसून तो वेगळा आहे’, असे लक्षात आले; पण व्यवसाय चालूच होता. त्यात चढ-उतार होते. ग्राहक, कर्मचारी यांच्याशी वाद होत असत. याविषयी विचार केल्यावर ‘त्या प्रसंगात माझा दोष कारणीभूत आहे’, हे लक्षात येत असे. मी त्यावर प्रयत्न केले. त्यानंतर व्यवसाय १० टक्क्यांवरून २०० टक्के वाढला. साधनेची शक्ती आपल्या पाठीशी असते. आता मी गाडीवरून जाता-येता नामजप करतो. आता मला ‘दुकान हे देवाचे मंदिर आहे’, असे वाटते. धर्माचे कार्य कधीही सोडू नये. एकवेळ कुटुंब आपल्याला सोडू शकते; पण धर्म आपल्याला कधीच सोडत नाही. त्यामुळे परात्पर गुरुदेवांच्या साधकांचे मार्गदर्शन घ्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेचा जो मार्ग दाखवला, तो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.

उद्योगपती अधिवेशनात हिदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘सनातन संस्थेवर होत असलेले आरोप आणि त्यांचे उत्तर’ यावरील माहिती देऊन शंकानिरसन केले. ‘उद्योगपतींनी हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, त्यांना पुरस्कार देणे अशा प्रकारे साहाय्य केल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल’, असेही आवाहन अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी या वेळी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *