Menu Close

बंगालमध्ये हिंदूंची दुर्दैशा तसेच हिंदु संस्कृती आणि संस्कृत रक्षणासाठी केलेले कार्य

जोपर्यंत देहात प्राण आहे, तोपर्यंत धर्माची हानी होऊ देणार नाही ! – अभिषेक जोशी, ओडिशा सुराख्य सेना, अध्यक्ष

अभिषेक जोशी, ओडिशा सुराख्य सेना, अध्यक्ष

‘हिंदु संस्कृतीचे रक्षण करतांना आंदोलनाचे महत्त्व आणि केलेले प्रयत्न’, या विषयावर बोलतांना ‘ओडिशा सुराख्य सेने’चे अध्यक्ष श्री. अभिषेक जोशी म्हणाले, ‘‘गेल्या ६ वर्षांपासून आमची संस्था धर्मरक्षणासाठी कार्य करत आहे. ओडिशा येथील जगन्नाथ मंदिर राज्य सरकारच्या कह्यात असून ते सरकारच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आमची संघटना प्रयत्नरत आहे. या मंदिरात सरकारने ‘बुफे’ व्यवस्थेद्वारे प्रसाद देण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात आम्ही आंदोलने, तसेच न्यायालयीन मार्गाने लढा देऊन सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. २६ जानेवारी २०१५ या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देहली येथील कार्यक्रमात तिरंगा ध्वजाला वंदन केले नव्हते. यासा विरोध करणारे पत्र आम्ही राष्ट्रपतींना पाठवले. देशातील सर्व प्रसिद्धीमाध्यमांनीही या पत्राची दखल घेतली. त्यामुळे दुसर्‍याच दिवशी उपराष्ट्रपती कार्यालयास प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा करावा लागला. अयोग्य गोष्टींना केवळ विरोधाचे जरी निवेदन पाठवले, तरी त्यास कसे यश येते ?, त्याचे हे उदाहरण आहे. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत धर्माची हानी होऊ देणार नाही.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी जन्मोजन्मीचा संपर्क असल्यासारखे वाटते ! – श्री. अभिषेक जोशी

मी गेल्या २ दिवसांपासून अधिवेशनस्थळी उपस्थित आहे; मात्र परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच येथील साधक यांच्याशी माझा जन्मोजन्मीचा संपर्क आहे, असे वाटते.

वैभव राऊत यांना अटक झाल्यावर केवळ ४ दिवसांत गावकर्‍यांच्या पुढाकारातून आंदोलन उभे राहून मोठा मोर्चा निघाला ! – दिप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती, पालघर, महाराष्ट्र

दिप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती, पालघर, महाराष्ट्र

आमच्या संघटनेत कोणीही अध्यक्ष नसून आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहोत. नालासोपारा प्रकरणात ‘हिंदु गोरक्षा समिती’चे श्री. वैभव राऊत यांना आतंकवाविरोधी पथकाने अटक केल्यावर ४ दिवसांत गावकर्‍यांच्या पुढाकारातून आंदोलन उभे राहिले आणि मोठा मोर्चा निघाला. हा मोर्चा न होण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दमनतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला; मात्र मोर्चा काढण्यावर गावकरी ठाम असल्याने शेवटी पोलीस आणि प्रशासन नमले. या मोर्चात मातृशक्तीचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, असे मत पालघर (महाराष्ट्र) येथील हिंदू गोवंश रक्षा समितीचे श्री. दिप्तेश पाटील यांनी व्यक्त केले. ते ‘गोरक्षा समितीचे नेते यांना अन्यायकारक बंदी बनवल्यावर ग्रामस्तरीय संघटन कसे उभा राहिले’, या विषयावर बोलत होते.

श्री. वैभव राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ गावकर्‍यांनी काढलेल्या मोर्चाचे चलचित्र दाखवतांना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य भगवान श्रीकृष्णाच्या आणि श्री महाकाली देवीच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होईल ! – स्वामी आत्मस्वरुपानंद महाराज

स्वामी आत्मस्वरुपानंद महाराज

‘भारत हिंदु राष्ट्र होता, आहे आणि राहील, अशी भावना मनात बाळगायला हवी. त्यासाठी हिंदूसंघटनाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म हाच एकमेव धर्म आहे. भारतात धर्माधारित शिक्षण द्यायला हवे. संस्कृत भाषेला पुनर्प्रतिष्ठा द्यायला हवी. पूर्वी ५१ व्या वर्षी व्यक्ती वानप्रस्थाश्रम स्वीकारत असे. आज ५१ व्या वर्षीही व्यक्ती नोकरीचा शोध घेते. मोहाचा त्याग करायला शिकले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती ज्या उद्देशाने कार्य करत आहे, ते कार्य श्रीकृष्णाच्या आणि महाकालीच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होईल’, असे आशीर्वाद बंगाल येथील स्वामी आत्मस्वरूपानंदजी महाराज यांनी दिले. ते ‘बंगालमध्ये हिंदूंची दुर्दैशा तसेच हिंदु संस्कृती आणि संस्कृत रक्षणासाठी केलेले कार्य’, या विषयावर बोलत होते.

धर्मांधांचा उदोउदो आणि हिंदूंचा दु:स्वास हे चित्र पालटणे आवश्यक ! – श्री. बिस्व ज्योती नाथ, महाकाली सेना, आसाम

श्री. बिस्व ज्योती नाथ, महाकाली सेना, आसाम

आसाममध्ये दिवसेेंदिवस धर्मांधांची संख्या वाढत आहे. आज निरीश्‍वरवादी असण्याची ‘फॅशन’ आली आहे. निरीश्‍वरवादी असल्याचे गर्वाने सांगितले जाते. ‘मुसलमानांनी डोक्यावर टोपी घातली’, तर त्याला त्यांचा धार्मिकपणा म्हटले जाते; पण हिंदूंनी कपाळाला टिळा लावला, तर त्यांना ‘कट्टरतावादी’ म्हणून हिणवले जाते. हे चित्र पालटायला हवे. ईशान्य भारतात एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्य एखाद्या ‘गतीरोधका’प्रमाणे आहे. तेे धर्मविरोधी कार्य रोखू शकत नाही. धर्मांधांचा उदोउदो आणि हिंदूंचा दु:स्वास हे चित्र पालटणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आसाम येथील श्री. बिस्व ज्योती यांनी केले. ते ‘आसाम राज्यात हिंदु युवकांचे संघटन करतांना केलेले प्रयत्न’, या विषयावरबोलत होते.

हिंदू अधिवेशनांतून मिळालेल्या अनुभवाद्वारे राज्यस्तरावर अशा अधिवेशनाचे यशस्वी आयोजन ! – विनोद यादव, धर्मरक्षक, संस्थापक-अध्यक्ष, भोपाळ, मध्यप्रदेश

विनोद यादव, धर्मरक्षक, संस्थापक-अध्यक्ष, भोपाळ, मध्यप्रदेश

गेल्या २ वर्षांपासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात जे शिकलो त्या अनुभवाद्वारे भोपाळ येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन केले. या अधिवेशनात आलेले तरुण युवक स्वत:हून सेवा करण्यात पुढाकार घेत होते. या अधिवेशनात साध्वी प्रज्ञासिंह याही उपस्थिती होत्या. भारतातील राजकीय पक्ष हे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेत कार्य करणार्‍या कार्यकत्यार्र्ंना राजकीय पदे देऊन त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करतात; मात्र आमची संघटना त्याला बधली नाही. भोपाळमध्ये विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणात हिंदूंची १६ मंदिरे पाडण्यात आली; मात्र मार्गातील २ मशिदींच्या ठिकाणी पूल सिद्ध केला; पण मशिदींना हातही लावला नाही, अशी माहिती भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक-अधक्ष श्री. विनोद यादव यांनी ‘मध्यप्रदेशमध्ये राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाद्वारे केलेले प्रयत्न आणि मिळालेले यश’, या विषयावर बोलतांना दिली.

क्षणचित्रे

१. सत्र चालू होण्याच्या अगोदर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी ‘अधिवेशनस्थळी सूक्ष्मातून होणारा परिणाम’, याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

२. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवेशनासाठी पाठवलेला संदेश श्री. सुमित सागवेकर यांनी वाचून दाखवला.

धर्मकार्य करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि श्रम आवश्यक ! – अधिवक्ता पप्पू मोरवाल, श्रीराम सेना, अकोला

अधिवक्ता पप्पू मोरवाल, श्रीराम सेना, अकोला

जेव्हा माझा हिंदु जनजागृती समितीशी संपर्क आला, तेव्हा ‘मला समाज आणि धर्म यांसाठी काहीतरी करावे’, असे वाटू लागले. त्यानंतर मी श्रीराम सेनेच्या माध्यमातून धर्मकार्याला आरंभ केला. जो धर्माच्या रक्षणासाठी कार्य करतो, तोच खरा अधिवक्ता होय. कार्य करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि श्रम यांची आवश्यकता असते. लोकांकडून अपेक्षा न करता आपण कार्य करत राहिलो, तर संघटन आपोआप निर्माण होते. संघटनामध्ये भरपूर शक्ती असते. संघटनामुळे कठीण काम करणेही शक्य होते.

बंगालमध्ये हिंदु जनजागृती समितीने भव्य हिंदू अधिवेशन आयोजित करावे ! – अनिर्बन नियोगी, सलकिया भारतीय साधक समाज, हावडा, बंगाल

अनिर्बन नियोगी, सलकिया भारतीय साधक समाज, हावडा, बंगाल

स्वातंत्र्यलढ्यामध्ये बहुतांश पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र येथील क्रांतीकारकांनी सहभाग घेतला. त्यामुळे क्रांतीकारकांच्या संघटनाला हानी पोहचवणे इंग्रजांचा कट होता. ‘कॅम्युनिस्टा’नी बंगालची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती नष्ट केली. आता बंगाल पुन्हा राष्ट्रवाद, हिंदु धर्म आणि संस्कृती यांकडे वळत आहे. त्यामुळे बंगालमध्ये हिंदूंचे संघटन करण्याची हीच वेळ आहे. त्याकरता आपल्याला जिल्हा, तालुका आणि गावा येथील घराघरांपर्यंत पोहचावे लागेल. बंगालमध्ये हिंदु जनजागृती समितीने एक भव्य हिंदू अधिवेशन आयोजित करावे. गोव्यात आल्यावर ‘हिंदु राष्ट्रा’त आल्यासारखे वाटले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *