गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील गुप्त वेशातील पोलिसांचा अधिवेशनस्थळी वावर !
पोलिसांकडून धातूशोधक यंत्रणा (मेटल डिटेक्टर) आणि श्वानपथक यांच्या माध्यमातून अधिवेशनस्थळावर लक्ष !
रामनाथी (गोवा) : रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. पहिल्या अधिवेशनापासून सातव्या अधिवेशनापर्यंत, म्हणजे मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत आणि वैध मार्गानेच झाले असून हिंदूंच्या न्याय मागण्या मांडणारे राष्ट्रीय व्यासपीठ अशीच या अधिवेशनाची गणना होत आहे. असे असतांना अचानक यंदाच्या अधिवेशनाला पोलिसांनी प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा बसवली आहे. अधिवेशनस्थळी पोलिसांकडून श्वानपथकाद्वारे अन्वेषण करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर अधिवेशनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला असून गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील गुप्त वेशातील पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. साध्या वेशातील हे पोलीस अधिवेशनाच्या परिसरात घिरट्या घालत आहेत.
वास्तविक शांततेच्या मार्गानेच मार्गक्रमण करणार्या अशा अधिवेशनासाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नसतांना पोलीस यंत्रणा अधिवेशनासाठी येणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात अकारण भय निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते. (अन्य पंथियांच्या कार्यक्रमांवर पोलीस अशी कधी करडी दृष्टी ठेवतात का ? मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस उपस्थित असतात, यावरून ‘अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी काहीतरी चुकीचे चालू आहे’, असे भासवण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे. त्यामळे सामान्य माणसाच्या मनात अधिवेशनाविषयी नकारात्मक मत निर्माण होऊ शकते. हिंदु जनजागृती समितीचे सर्वच कार्यक्रम वैध मार्गाने होत असल्याने पोलिसांनी हेच बळ जिहादी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त होण्यास साहाय्य झाले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात