हिंदु धर्माभिमानी युवकांचा सहभाग
नाशिक : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथे हिंदु धर्माभिमानी युवकांनी महादेवाच्या संकल्प पूजेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. येथील गंगापूर गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या परिसरातील संगमेश्वर महादेव मंदिरात स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येणारे युवक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमधडे दर्शनासाठी गेले असता त्यांची मंदिराचे पुजारी गणेश महाराज यांच्याशी भेट झाली. या वेळी श्री. गौरव जमधडे यांनी त्यांना समितीच्या कार्याची, तसेच गावात चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची माहिती दिली. महाराजांनी समिती करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि मंदिरामध्ये उपस्थित पुरोहित बापूराव मुळे महाराज यांना प्रशिक्षणवर्गातील युवकांकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प विधी करण्यास स्वतःहून सांगितले. त्याप्रमाणे पुरोहित मुळे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महादेवाची संकल्प पूजा केली.
गंगापूर गावातील युवक समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होत असतात. श्री. गौरव जमधडे यांनी त्यांना ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न’ यावर मार्गदर्शन केले. त्या वेळी युवकांनी उत्स्फूर्तपणे आम्हीही या कार्यात सहभागी होऊन आमचे योगदान देणार असल्याचे सांगितले. हिंदु धर्माभिमानी युवकांचा महादेवाच्या संकल्प पूजेत सहभाग, हे याच दिशेने पहिले पाऊल ठरले ! या वेळी समितीचे श्री. गौरव जमधडे, मुळे महाराज, सनातन संस्थेचे श्री. राहुल पाटील आणि धर्माभिमानी युवक उपस्थित होते.