‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’च्या समारोपीय सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन
सामाजिक प्रसारमाध्यमांच्या वापरापर्यंत मर्यादित न रहाता हिंदु राष्ट्राच्या विचाराची प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते बना ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु धर्माला अनेक समस्यांनी घेरलेले आहे. या समस्यांशी वेगवेगळे लढण्यापेक्षा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे, हे त्या माध्यमातून धर्मकार्य करणार्या कार्यकर्त्याने लक्षात ठेवलेे पाहिजे आणि सामाजिक प्रसारमाध्यमांच्या (‘सोशल मीडिया’च्या) वापरापर्यंत मर्यादित न रहाता हिंदु राष्ट्राच्या विषयाचे अध्ययन करून समाजात प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते बना. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असे प्रतिपादन २ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत १ दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’च्या समारोपीय सत्रात केले. या वेळी व्यासपिठावर ‘अपवर्ड’ संघटनेचे सहसंस्थापक श्री. अजय शर्मा, प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन’चे ‘पार्टनर’ श्री. नंदन मिश्रा, आंध्रप्रदेश येथील शिवशक्ती संघटनेचे सदस्य श्री. रंजित वाडियाला आणि अमरावती येथील आसारामजी बापू संप्रदायचे श्री. मानव बुद्धदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले,
१. ‘‘सध्या साम्यवादी लोक आणि त्यांच्या हाताखालील प्रसारमाध्यमे त्यांचे विचार हिंदूंवर लादत आहेत. या विचारांचे खंडण करणारे सनातन धर्मातील विचार ‘सोशल मीडिया’द्वारे पोचवायला हवेत. याने फलनिष्पत्ती वाढू शकते.
२. कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एकत्र आल्याने आपल्यात धर्मबंधुत्व निर्माण झाले आहे. आपापल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर हिंदुत्वाचे कार्य करणार्यांनाही यात जोडावे. सामाजिक प्रसारमाध्यमांवरील धर्मविरोधी विचारांचे चांगल्या प्रकारे खंडण करणारे आणि कायदेशीर साहाय्य मिळण्यासाठी स्थानिक अधिवक्ते यांनाही जोडावे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय समोर ठेवून हे कार्य केल्यास अल्प वेळात आणि अल्प शक्तीत यश मिळू शकते. या संघटनातूनच ज्ञानशक्तीचे कार्य होऊ शकते.
३. हिंदूंवरील अन्यायाविषयीची सत्यस्थिती कळू लागल्याने स्वयंप्रेरणेने कार्य करणार्या युवकांत तंत्रकुशलता निर्माण करून त्याद्वारे हिंदुत्वाचे कार्य करणारी नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
साम्यवाद्यांचे पितळ उघडे करण्यात सामाजिक प्रसारमाध्यमे यशस्वी ! – रंजित वाडियाला, सदस्य, ‘शिवशक्ती’ संघटना, विशाखापट्टणम्
१. सध्या एखादे वृत्त पोचवण्यासाठी पुस्तक, वृत्तपत्रे, दूरदर्शन आदी माध्यमे मागे पडली असून त्यांची जागा प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. वृत्त पोचवणार्या या माध्यमाकडे मोठी शक्ती असते. ती लोकांना दिशा देण्याचे कार्य करते. साम्यवादी लोकांनी या प्रभावी माध्यमाची शक्ती आधीच लक्षात घेऊन ती कह्यात घेतली. हे प्रभावी माध्यम सध्या ४-५ संघटनांकडे असून त्या देशातील करोडो लोकांना नियंत्रित आणि प्रभावित करत आहेत. यावर सामाजिक प्रसारमाध्यमे हे वैचारिक शस्त्र आहे. साम्यवाद्यांचे पितळ उघडे करण्यात सामाजिक प्रसारमाध्यमांना मोठे यश आले आहे.
२. सामाजिक प्रसारमाध्यमांतून आपण जे काही ‘पोस्ट’ करू त्या विषयाचा आधी अभ्यास करा आणि मग मत मांडा. त्यामुळे लोकांमध्ये आपल्याविषयी विश्वास निर्माण होतो. सामाजिक प्रसारमाध्यमांत स्वत:ची प्रतिमा सिद्ध करणे आवश्यक आहे. कोणाला पालटण्याचा प्रयत्न न करता खर्या गोष्टी मांडायला हव्यात. त्यामुळे लोक आपोआप आपल्याकडे वळतात.
सामाजिक प्रसारमाध्यमांतील लिखाण नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे बनवणे आवश्यक ! – अजय शर्मा, अपवर्ड, सहसंस्थापक
भारतातील प्रसारमाध्यमे डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या कह्यात आहेत. त्यामुळे तेथे हिंदु धर्माला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही आणि हिंदु संस्था अन् संघटना या मुख्य प्रवाहापासून लांब रहातात. त्यामुळे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधातील हिंदूंचा वैचारिक प्रतिकार न्यून पडतो. अशा स्थितीत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर अवलंबून न रहाता सामाजिक प्रसारमाध्यमांतील विचार जगासमोर मांडले पाहिजे. जगात आपले विचार स्वीकारले जाण्यासाठी आपण सामाजिक प्रसारमाध्यमांतून नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे लिखाण करणे आवश्यक आहे. या समवेतच या क्षेत्रात आपल्याला गुंतवणूकही केली पाहिजे.
अपप्रचाराचे खंडण करणार्या धर्मप्रेमींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ! – नंदन मिश्रा, ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन्स’
जे लोक सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे हिंदूंची बाजू मांडतात किंवा हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात वैचारिक खंडन करतात, त्यांना डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून लक्ष्य केले जाते. या समवेतच काही धर्मप्रेमी अपप्रचाराच्या विरोधात ऐतिहासिक सत्य समोर मांडतात. तेव्हा त्यांचे खाते निलंबित केले जाते. अशा धर्मप्रेमींच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून एकमेकांना साहाय्य केले पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन्स’चे श्री. नंदन मिश्रा यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमांद्वारे हिंदु धर्मावर आघात केल्या जाते. तेव्हा त्या विरोधात वैचारिक मार्गाने लढणार्या धर्मप्रेमींना पुरोगामी किंवा डावे विचारक लक्ष्य करतात, तेव्हा प्रसारमाध्यमांवर सक्रीय असलेल्या हिंदूंकडून सहकार्य मिळत नाही. याउलट डावे संघटित असतात. सामाजिक माध्यमांतून विचार मांडतांना शब्दांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी धैर्याने आणि ठामपणे विरोध केला पाहिजे.’’
अमरावती येथील आसारामजी बापू संप्रदायचे मानव बुद्धदेव यांना सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी उपयोग करतांना आलेले अनुभव !
१. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी आसाराम बापू यांना रावण म्हटल्याचे खोटे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. संतांची अपकीर्ती करणार्या या वृत्तपत्राचा क्रमांक ‘व्हॉटस्अॅप’द्वारे आसारामजी बापूंच्या अन्य भक्तांना पाठवल्यावर वृत्तपत्राच्या संपादकांना अनेक फोन गेले. आणखी एका वृत्तपत्रानेही असा प्रकार केला. तेव्हाही त्या वृत्तपत्राचा संपर्क क्रमांक भक्तांना पाठवला. परिणामस्वरूप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर माफीनामा प्रसिद्ध करावा लागला.
२. एकदा एका सभेत मागासवर्गीय नेत्याने ‘भगवद्गीता कचर्याच्या डब्यात टाका’, असे म्हटले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘भगवद्गीता टाकायचीच असल्यास आधी तुमच्या कचर्याच्या डब्यात म्हणजे मेंदूत टाकायला हवी’, अशा आशयाची एक कविता बनवून ‘यूट्युब’वर पोस्ट केली. त्याला अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
३. निषेधाचे दूरध्वनी करतांना तो संयत मार्गाने करावा. पुराव्यासाठी तक्रार करतांना ‘कॉल रेकॉर्ड’ करा. भ्रमणभाषचा ‘स्क्रीनशॉट’ घ्या. बर्याचदा ‘व्हॉटस्अॅप’वर एखादा संदेश आल्यावर हिंदू नीट न वाचताच पुढे पाठवतात.
‘अन्य वृत्तपत्रे खोटी वृत्ते देतात. त्यामुळे मी सनातन प्रभातविना अन्य कोणतेही वृत्तपत्र वाचत नाही’, असे श्री. मानव बुद्धदेव या वेळी म्हणाले.